- अशोक चव्हाण यांच्यासोबतचे ते ११ आमदार तेच आहेत जे.. २०१७-१८मध्ये शिवसेनेने खिशात ठेवलेले राजीनामे बाहेर काढले असते तर.. राधाकृष्ण विखे पाट...
- अशोक चव्हाण यांच्यासोबतचे ते ११ आमदार तेच आहेत जे.. २०१७-१८मध्ये शिवसेनेने खिशात ठेवलेले राजीनामे बाहेर काढले असते तर..
राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये
प्रवेश करून सरकार वाचविणार होते..!!
- २००८-०९मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांचं किचन कॅबिनेट 'प्रवरे'तून ऑपरेट होत होतं..!!
- डिसेंबर २००८ : नेमकं काय घडलं काँग्रेसमध्ये..?
मर्मभेद : अनिरुद्ध देवचक्के
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजप - शिवसेना युतीचे सरकार असतानाही (२०१४ - २०१९ ) रुसवे-फुगवे, धूसफूस, टोमणे, खिशात राजीनामे घेऊन फिरणं या बाबी सातत्याने सुरू होत्याच. उद्धव ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी 'ससेमिरा' तेंव्हाही देवेंद्र फडणवीस यांच्या मागे होताच.. "देवाभाऊंना" त्याचाच सूड घ्यायचा होताच तो शेवटी घेतलाच..!!
तत्कालीन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे सर्व सहकारी, "आम्ही राजीनामे खिशात ठेवून फिरतो" असे इशारे देत भाजपाला खिजवायचे. शिवसेना कधीही सत्तेतून बाहेर पडू शकते, असं वातावरण निर्माण करण्यात आणि भाजपवर दबाव कायम ठेवण्यात उद्धव ठाकरेंना यश आलेलं होतं.
सरकारमध्ये अस्वस्थता असताना देवेंद्र फडणवीस मात्र मुख्यमंत्री म्हणून एकदम निर्धास्त होते.. निवांत होते.
"शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला तरी राज्यातील सरकार कोसळणार नाही, आमच्याकडे १२ आमदारांचे पाठबळ आहे", असं छाती ठोकपणे सांगितलं जायचं. हे १२ आमदार नेमके कोण आणि कोणत्या पक्षाचे ? याची चर्चा रंगलेली असतानाच तत्कालीन काँग्रेस नेते "राधाकृष्ण विखे पाटील" यांचं नाव पुढे आलं. राधाकृष्ण विखे पाटील आपल्या सोबत कॉंग्रेसचे ११ आमदार घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, असा अंदाज होता. प्रत्यक्षात पुढे तसं काही घडलं नाही, हा भाग वेगळा.. शिवसेना आमदारांचे राजीनामे त्यांच्याच खिशात राहिले आणि शेवटी शिवसेनाच फुटली. काळाच्या ओघात २०१९च्या निवडणुकीमध्ये भाजपने लोकसभेच्या अहमदनगर दक्षिण मतदार संघातून राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांना पक्ष प्रवेश देऊन उमेदवारी दिली. निवडून आणलं. ते खासदारही झाले आणि त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या आमंत्रणावरून वाजत गाजत भाजपमध्ये प्रवेश केला. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणून दुसऱ्या क्रमांकाचे स्थान ते पटकावून आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणाची नाडी ओळखून असलेल्या राधाकृष्ण विखेंना, देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये चांगलंच स्थिर-स्थावर केलेलं आहे. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्येच मागे राहिलेल्या त्या ११ आमदारांचं काय झालं? असा प्रश्न सर्वांनाच पडलेला होता. त्याचं उत्तर आता अशोक चव्हाण यांच्या संभाव्य भाजप प्रवेशातून मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वतः अशोक चव्हाण यांच्यासोबत जे १० आमदार भाजपच्या वाटेवर आहेत, हे तेच आमदार आहेत का? जे २०१७-२०१८ मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर भाजप प्रवेश करून सरकार वाचविणार होते...
कळेल.. लवकरच कळेल..!
२०००च्या दशकात बाळासाहेब विखे पाटील यांना मानणारे दोन नेते होते. नारायण राणे आणि अशोक चव्हाण. त्यापैकी नारायण राणे कधीच भाजपात आले आणि केंद्रीय मंत्री देखील झाले. आता पुढचा नंबर अशोक चव्हाण यांचा.. त्यांचा भाजप प्रवेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत येत्या दोन-तीन दिवसातच होऊ शकतो आणि त्यांना २७ फेब्रुवारी रोजी भाजपच्या कोट्यातून थेट राज्यसभेवर देखील पाठविलं जाऊ शकतं. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पाठोपाठ भाजपने महाराष्ट्रात काँग्रेसच्या संदर्भामध्ये ही जी नवी खेळी केलेली आहे त्याचं बरसं श्रेय देवेंद्र फडणवीस पाठोपाठ महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनाच जाताना यामुळेच दिसतंय.
काय झालं होतं डिसेंबर २००८मध्ये?
बाळासाहेब विखेंचं नांवही डिसेंबर २००८ मध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होतं. तेव्हा नुकतेच शिवसेनेमध्ये बंड करून काँग्रेसमध्ये आलेले नारायण राणे आणि अशोक चव्हाण यांच्याही नावाची चर्चा मुख्यमंत्री पदासाठी होती बाळासाहेब विखे यांचा सोनिया दरबारी चांगलाच होल्ड होता आणि त्यामुळे विखे ज्या नावाची शिफारस करतील, त्यांनाच मुख्यमंत्रीपद मिळेल असे चित्र होते. बऱ्याच घडामोडीनंतर नारायण राणे यांचे नाव मागे पडून मुख्यमंत्री पदाची ही शर्यत अशोक चव्हाण यांनी जिंकली होती.
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी अशोक चव्हाण यांची निवड झाल्यानंतर रविवार, दि. ७/१२/२००८ रोजी त्यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी झाला आणि नव्या दमाचे सरकार महाराष्ट्रात स्थानापन्न झाले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर काहीशा अस्वस्थतेच्या वातावरणातच ती निवड झालेली असल्याने राज्यात आनंदोत्सव साजरा करण्यासारखी परिस्थिती नव्हती. तेवढा संयम नवे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दाखविला होता.
मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये खा. बाळासाहेब विखे पाटलांचे नाव अग्रक्रमाने घेतले जावू लागल्यानंतर जिल्ह्यात विखे गटात कमालीचे उत्साही वातावरण होते. त्याचबरोबर विखे विरोधी गटात शांतता पसरली होती. उद्या बाळासाहेब विखे मुख्यमंत्री झाले तर काय ? या प्रश्नाने जिल्ह्यातील अनेकांच्या झोपाही उडाल्या होत्या. बाळासाहेब विखे पाटील हे व्यक्तीमत्व आजही अनेकांना उलगडलेलं नाही. जे साध्य करायचं आहे त्यासाठी वेगळ्या मार्गाने बाळासाहेबांचे प्रयत्न सुरू असतात. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं की नाही? हा प्रश्न तसा फार गौण आहे आणि व्हायचं असतं तर त्यांनी अशा प्रकारे जाहीरपणाने त्याचं प्रगटन केलंही नसतं. कदाचित शेवटच्या क्षणी अगदी ऐनवेळेला त्याचं नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर होवू शकलं असतं, त्यासाठी जीव तोडून प्रयत्न करण्याची विखे पाटलांना तशी गरज नाही. असे असताना देखील बाळासाहेब तेंव्हा विविध वाहिन्यांवर झळकले. दिल्लीला जावून आले आणि मुख्यमंत्री निवडीच्या प्रक्रियेत हिरीरीने सहभागी झाले हे गौडबंगाल भल्याभल्यांना उलगडणारे नसले तरी त्यातल्या अंतर्गत गमतीजमती थोडा विचार केला तर लक्षात येऊ शकतात.
नारायण राणे मुख्यमंत्री झाले काय आणि अशोक चव्हाण झाले काय दोघेही बाळासाहेबांना सारखेच होते. स्वतः मुख्यमंत्री होण्यापेक्षा होणारा मुख्यमंत्री आपल्या मर्जीतला असावा हे विखे पाटलांचे धोरण ! थोडक्यात स्वतः किंग होण्यापेक्षा किंगमेकर म्हणून राजकारणातील सारीपाटावर सोंगट्या खेळवणं हाच खरा राजकारणातील 'प्रवरा पॅटर्न..!'
सुरूवातीला विखे पाटील राणेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचे चित्र निर्माण झालं होतं. नारायण राणेंचा काँग्रेस प्रवेश विखे पाटलांमुळे सहज शक्य झाला होता हे महाराष्ट्राला माहित आहे. परंतु ज्यावेळेला राणे स्वतःच्या आक्रमक स्वभावामुळे पक्षश्रेष्ठींच्या मनातून उतरले, त्याचवेळेला बाळासाहेब विखेंनी देखील त्यांनी धरलेलं बोट झटकून टाकलं होतं. मधल्या काळात सोनिया गांधी, मनमोहनसिंग आणि शरद पवार या तिन्ही नेत्यांशी त्यांनी जाणीवपूर्वक जवळीक निर्माण केली होती. राणेंचं वजन कमी होत असताना विखे पाटील त्यांच्याबरोबरच कायम राहतील असे समजणं म्हणजे अपरिवक्व राजकारणाचं लक्षण आहे. तरीही जेव्हा नव्या मुख्यमंत्रीपदाचा डंका वाजू लागला तेव्हा विखे पाटील त्यात उतरले. पत्रकारांनी विचारलं, आपण राणे यांच्यासाठी प्रयत्नशील आहात काय? त्यावर मी कोणासाठीही प्रयत्न करीत नाही. मी स्वतः इच्छुक आहे असेही त्यांनी सांगून टाकलं.
दरम्यानच्या काळात राणे विरोधी गटाने उचल खाल्ली. विलासराव देशमुखांनी आपलं समर्थन अशोक चव्हाणांच्या पारड्यात टाकलं. विखे पाटील या दोघांच्या रेसमध्ये जाणीवपूर्वक स्वतःचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी घुसवून होते. जेव्हा राणेंच्या नावावर खाट पडली तेव्हाच अशोक चव्हाण मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं आणि तेव्हा खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना उसंत लाभली. राणे मुख्यमंत्री झाले असते तरी देखील सरशी बाळासाहेब विखेंची झाली असती आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले तेंव्हाही विजय विखे पाटलांचाच झालेला होता.
बाळासाहेब विखे पाटील आणि माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यातलं नातंच असं होतं. शंकरराव चव्हाणांचे जवळचे मित्र म्हणून बाळासाहेबांचा उल्लेख होत होता. ज्या ज्यावेळेला काही राजकीय समीकरणे जुळविण्याची वेळ येत असे त्यावेळी शंकरराव चव्हाणांच्या वतीने ही सर्व कामगिरी विखे पाटीलच पार पाडत. एका अर्थाने चव्हाण साहेब बाळासाहेब विखेंचे राजकीय गुरू आहेत असे म्हटलं जाई. कालांतराने या शिष्यानेच गुरूसाठी इतकं काही करून ठेवलं की बाळासाहेबच आता माझे गुरू ठरतात की काय ? असे कौतुकाचे उद्गार शंकरराव चव्हाणांनी काढले होते.
शरद पवार विरूद्ध शंकरराव चव्हाण या संघर्षात बाळासाहेब विखे पाटलांनी बजावलेली भूमिका त्यावेळी खूप महत्त्वाची ठरली होती. विलासराव देशमुखही चव्हाणांच्या गटात होते. ही सगळी पार्श्वभूमी बघितली तर नारायण राणे यांच्यापेक्षाही अशोक चव्हाण मुख्यमंत्री होणं बाळासाहेब विखेंसाठी कधीही फायद्याचं होतं. विलासराव देशमुखांनी मधल्या काळात डोईजड नको म्हणून बाळासाहेबांना आणि राधाकृष्ण विखेंना बाजूला ठेवलं होतं. त्यांचे जिल्ह्यातील विरोधक थोरात यांना विलासरावांनी चांगल बळ दिलं, त्यामुळे विखे - थोरात गटामध्ये दरार निर्माण झालेला होता.अशोक चव्हाणांच्या मदतीने विखे पाटलांनी राजकारणातला आपला सगळा वचपा काढला होता. चव्हाणांच्या मुख्यमंत्री पदाचा फायदा नंतरच्या काळात विखे पाटलांना चांगलाच झाला. त्या काळात अशोक चव्हाण यांचा अनुभव कमी होता. त्यांना अकरा महिन्याच्या काळात स्वतःच्या कार्याची चमक दाखवून द्यावी लागणार होती. आणि त्यासाठी त्यांना बाळासाहेब विखे पाटलांच्या मार्गदर्शनाची गरज होती. म्हणून तेव्हा असंही म्हटलं जायचं की, "बाळासाहेब विखे पाटील आणि त्यांचा प्रवरा ग्रुप नव्या मुख्यमंत्र्यासाठी 'किचन कॅबिनेट' म्हणून काम करू शकतो म्हणून..!"
आज महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शंकराव चव्हाण हयात नाहीत आणि माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील देखील.. त्यांची दुसरी पिढी म्हणजे अशोक चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील जुना वारसा नव्या दमाने राजकारणात पुढे चालवीत आहेत. नारायण राणे, अशोक चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील भाजपची काँग्रेस कधी आणि कशी करून टाकतील, हे काळाच्या ओघात दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस यांनाही कदाचित उमजणार नाही...!!
- अनिरुद्ध देवचक्के
९८९०६६४७७९
aniruddha.devchakke@gmail.com
COMMENTS