हमारा सपना.. मनी.. मनी!! - फॉरेक्स ट्रेडिंगच्या नांवाखाली नगरच्या डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि उद्योगपतींनाच गंडवलंय चक्क २०० कोटी रुपयांना.. अ...
हमारा सपना.. मनी.. मनी!!
- फॉरेक्स ट्रेडिंगच्या नांवाखाली नगरच्या डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि उद्योगपतींनाच गंडवलंय चक्क २०० कोटी रुपयांना..
अवघ्या पाचच मिनिटात ऑनलाइन स्क्रीन वरून गायब झाला फॉरेक्स ट्रेडिंगचा डाटा
बँकेच्या खात्यातून कंपनीच्या खात्यावर झाले होते ऑनलाइन ट्रान्सफर.. तरीही लिखित तक्रार द्यायला कोणीच तयार नाही..
ईडीने कलकत्त्यात कारवाई करून सहा प्रवर्तक पकडले. जप्त झाली त्यांची संपत्ती.. गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळू शकतात पण तक्रार करण्याचे धाडस दाखवायचं कोणी..!
धक्का बसलाय ना.. हे सर्व वाचून!! पण दुर्दैवाने हे सगळं खरंय..
अहमदनगर क्लबच्या हिरवळीवर एखाद्या निवांत संध्याकाळी जरा कान उघडे ठेवून बसा. आजूबाजूच्या टेबलवर बसलेल्या अशाच अनेक डॉक्टर, इंजिनियर्स, उद्योगपती, बिल्डर यांच्या विविध ग्रुपमध्ये, दबक्या आवाजात चाललेली चर्चा तुमच्या कानावर पडू द्या.. तेंव्हा तुम्हाला समजेल. गुंतवणुकीतली ही फसवणूक किती मोठी आहे ते..
हा प्रकार काल परवाचा नाहीये. त्याला साधारणता वर्ष झालंय. यामध्ये कोणाची दहा लाख, वीस लाख पन्नास लाख, एक कोटी एवढ्या मोठ्या रकमेपर्यंत फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे.
शहरामध्ये उच्चभ्रू मंडळींच्या उठण्या- बसण्याची जी काही ठिकाण आहेत, अशा सर्व ठिकाणी, 'तुझे किती गेले आणि माझे किती गेले', यावर चर्चा सुरू असते. बरं.. यात तुमच्या आमच्या सारखी छोटी मोठी मंडळीही मागे नाही. फक्त त्यांच्या रकमेचा आकडा थोडा कमी आहे एवढेच.. ज्यांना कायद्याचे जाणकार म्हणावे, असे काही वकील आणि पोलीस अधिकारीसुद्धा या आमिषाला बळी पडल्याचे सांगितले जाते.. शहरातले काही ठराविक सीए, गुंतवणूक सल्लागार यांच्याकडे जर खाजगीत चौकशी केली, तर तेही तुम्हाला सांगून टाकतील असा प्रकार घडलेला आहे खरा म्हणून..! कारण शेवटी सल्ला घ्यायला याच लोकांकडे यावं लागतं आणि यांचा एकच सल्ला असतो 'पोलिसांकडे जा आणि गुन्हा नोंदवा', पण..
"तेवढं सोडून बोला.. असं यांचं म्हणणं असतं.."
आता तुम्ही म्हणाल हे सारं खरं कशावरून..? बरोबर आहे तुमचं.. फसवणूक तर झालीये.. गुन्हा तर घडलाय.. पण तो नोंदवलाच गेला नाही तर तो खरा कसा मानायचा..? यात नेमकं उलट झालंय.. ज्या लोकांनी फसवणूक केली आहे आणि जे आरोपी होते त्यांना, १) प्रसेनजीत दास २) शैलेश कुमार पांडे,३) तुषार पटेल, ४) विराज सुहास पाटील आणि ५)जोसेफ मार्टिनेझ व अन्य व्यक्ती यांना कलकत्ता पोलिसांनी अटकही केली आहे. ही सारी मंडळी सध्या कलकत्ता येथील अलीपुर तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत आणि इतकंच नव्हे तर त्यांची सुमारे 185.16 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने गोठवली आहे.
या संदर्भात ईडीने (होय तीच ती.. आपली ईडी) रीतसर एक प्रेस रिलीज 12 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्धीला दिली आहे. काय म्हटले आहे या प्रेस रिलीज मध्ये तेही एकदा पाहून घ्या...
अंमलबजावणी संचलनालय प्रेस रिलीज :
१२ जानेवारी २०२४
" अंमलबजावणी संचालनालयाने (ED) 11/1/2024 रोजी कोलकाता येथे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायदा (PMLA), 2002च्या तरतुदी अंतर्गत तपास केला. त्यात आढळून आलेल्या तथ्यानुसार TM Traders आणि KK Tradersच्या बँकेतील खात्यामधून आणि बायनान्स ( Binance)क्रिप्टो एक्सचेंजमधील क्रिप्टो वॉलेट मधील क्रिप्टो चलन ( BTC 1.46, रू. 57 लाख रुपयांच्या समतुल्य) 64 लाख जप्त केले आहेत.
मेसर्स TM Traders आणि मेसर्स KK Traders विरुद्ध आयपीसी - 1860च्या विविध कलमांखाली कलकत्ता पोलिसांनी नोंदवलेल्या एफ.आय.आर. च्या आधारे ईडीने तपास सुरू केला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नुसार, TP Global FX ही संस्था RBIकडे नोंदणीकृत नाही किंवा फॉरेक्स ट्रेडिंगसाठी RBI कडून तिला कोणतीही परवानगी नाही. RBI ने TP Global FXच्या नांवासह 07.09.2022 च्या प्रेस रिलीज मध्ये एक अलर्ट लिस्ट देखील जारी केली आहे, जी अनाधिकृत ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सपासून सामान्य लोकांना सावध करण्यासाठी प्रकाशित करण्यात आली होती.
ईडीच्या तपासात असे समोर आले आहे की प्रसेनजीत दास, शैलेश कुमार पांडे, तुषार पटेल आणि इतर व्यक्तींनी विविध डमी कंपन्या/फर्म/संस्थांद्वारे TP Global FX च्या प्लॅटफॉर्म/वेबसाइटचा वापर करून फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली जनतेची फसवणूक केली. हे निधी नंतर आरोपी व्यक्तींच्या वैयक्तिक फायद्यासाठी/ जंगम/अचल मालमत्तांच्या खरेदीसाठी वापरले गेले. IX Globalचे सदस्य/वापरकर्ता त्यांच्या विदेशी मुद्रा व्यापारासाठी TP Global FXच्या ब्रोकरेज सेवा वापरतात. IX Global ला TP Global FXच्या जाहिरातीमध्ये गुन्ह्याची प्रक्रिया मिळाली आणि विराज सुहास पाटील आणि जोसेफ मार्टिनेझ यांची नावे निष्पन्न झाली.
ईडीच्या तपासात असे समोर आले आहे की प्रसेनजीत दास, शैलेश कुमार पांडे, तुषार पटेल आणि इतर व्यक्तींनी विविध डमी कंपन्या/फर्म/संस्थांद्वारे TP Global FX च्या प्लॅटफॉर्म/वेबसाइटचा वापर करून फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली जनतेची फसवणूक केली. हे निधी नंतर आरोपी व्यक्तींच्या वैयक्तिक फायद्यासाठी/ जंगम/अचल मालमत्तांच्या खरेदीसाठी वापरले गेले. IX Globalचे सदस्य/वापरकर्ता त्यांच्या विदेशी मुद्रा व्यापारासाठी TP Global FXच्या ब्रोकरेज सेवा वापरतात. IX Global ला TP Global FXच्या जाहिरातीमध्ये गुन्ह्याची प्रक्रिया मिळाली आणि विराज सुहास पाटील आणि जोसेफ मार्टिनेझ यांची नावे निष्पन्न झाली.
यापूर्वी, ईडीने शैलेश कुमार पांडे, प्रसेनजीत दास आणि विराज सुहास पाटील यांना अटक केली होती. जे सध्या कलकत्ता येथील अलिपूर तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत.
या प्रकरणात, PMLA च्या 17(1A) अंतर्गत बँक खात्यांमध्ये 121.16 कोटी रुपये गोठवण्यात आले आहेत. रोख, सोने, फ्लॅट, हॉटेल आणि रिसॉर्ट्स आणि वाहने या स्वरूपातील 121.23 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आणि खटला चालवला गेला आहे. शैलेश कुमार पांडे आणि प्रसेनजीत दास यांच्याविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत आणि माननीय विशेष न्यायालयाने (PMLA) मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याची दखल घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे."
वाचली ना प्रेस नोट.. आता तरीही तुम्ही म्हणाल "या आरोपींचा आणि नगर शहराचा काय संबंध..?"
त्याचं झालं असं..
नगरच्या आपल्याच एका वकील मित्राचे काही क्लाइंट्स मुंबई - पुण्यात आहेत. त्यांची पण फसवणूक झाली होती. म्हणून त्यांनी या वकील मित्राला संपर्क केला. कलकत्ता पोलिसांनी आणि ईडीने केलेल्या कारवाईत तेच आरोपी आहेत, ज्यांनी आपल्या क्लाइंट्सची फसवणूक केली हे लक्षात आलं तेव्हा हे आपले वकील मित्र कलकत्त्याला गेले आणि तिथे गेल्यानंतर पोलीस तपासामध्ये जी काही माहिती पोलिसांना मिळाली होती, त्याची कागदपत्रे पाहून यांचे तर डोळेच विस्फारले. कारण त्या कागदपत्रांमध्ये जे डिटेल्स होते, त्यात बरीचशी नावं तर नगरचीच होती... विराज सुहास पाटील यांच्याशी संबंधित..!! सर्व आरोपी मुळातच हुशार त्यामुळे आपल्याविरुद्ध कारवाई होते आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपला सगळा ऑनलाईन डाटा इरेज करून टाकला किंवा डिलीट करून टाकला. ज्या क्षणाला त्यांनी हे कृत्य केलं, त्याच क्षणाला नगरसह अन्य शहरातील गुंतवणूकदारांच्या कॉम्प्युटर्स स्क्रीन वरून त्यांचे ऑनलाइन अकाउंट डिटेल डिलीट झाले आणि अशा रीतीने बुडाली ही रक्कम..!
आता आरोपींची बँक खाती गोठविण्यात आली आहेत. त्यांची संपत्ती देखील जप्त करण्यात आली आहे आणि या संदर्भातला खटला ईडी न्यायालयात सुरू आहे. जप्त केलेल्या संपत्तीतून आणि बँक खात्यातील रकमेतून फसवणूक झालेल्यांना आपली रक्कम परत मिळवण्याची संधी नक्कीच आहे; पण कधी? तर त्यासाठी त्यांना ईडीकडे आपली फसवणूक झाल्याचा झाल्याची तक्रार नोंदवावी लागेल. अशा तक्रारी जर नोंदविल्या गेल्या नाहीत तर हा सगळा पैसा आमचाच आहे आणि आम्ही तो दुसऱ्या कंपनीतून आमच्या खात्यात ट्रान्सफर केला होता, असा दावा ही आरोपी मंडळी न्यायालयात करू शकतात आणि त्यावेळेला ही संपत्ती पुन्हा त्यांना परत मिळू शकते. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या नगरच्या लोकांनी जी रक्कम गुंतवलेली आहे ती बुडालीच..!!
पोलिसांचा तपास सुरूच आहे. त्यांच्याकडे सर्व डिटेल्स उपलब्ध आहेत. सर्व व्यवहार ऑनलाइन झालेले आहेत. त्यामुळे कधी न कधीतरी ते उघडकीस येणार आहेतच. त्यापेक्षा त्या रकमेवर दावा सांगायला काय हरकत आहे? आणि त्यासाठी मुदत आहे 90 दिवसांची म्हणजे मार्च एंड पर्यंत..
फोरेक्स ट्रेडिंगचे असे प्रकार फक्त पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्येच घडतात असं आजपर्यंत आपल्याला वाटत होतं. परंतु त्याचं लोण आता नगर पर्यंत तर पोहोचलेलं आहेच; इतकंच कशाला याच पद्धतीचं ट्रेडिंग करण्याचं अमिष आता पाथर्डी आणि शेवगाव, जामखेड तालुक्यातील आमच्या बिचार्या भोळ्या - भाबड्या शेतकरी, शिक्षक, कष्टकरी लोकांना दाखविलं जातंय. आणि हे आमचे भाऊबंद बँकेतल्या ठेवी काढून, सोसायटीचे कर्ज काढून, जमीन जुमला विकून आपले पैसे या अशा फसव्या ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये व्यवहार करणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवित आणि हा आकडा आता गेलाय म्हणे.. तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयांपर्यंत..!!!
काय करायचं आता या लोकांचं.. कसं समजवायचं त्यांना.. सरकार, रिझर्व बँक आणि ईडी सुद्धा सांगून सांगून थकलीय.. दमलीय..
तरीही विश्वास नाही ना बसत तर मग आता ही आपल्या पुण्यातली बातमी बघा..
पुणे, 06 मे : गुंतवणूक करून त्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात परतावा मिळणं शक्य नसतं, ही वस्तुस्थिती आहे. तरीही आजही अनेक जण अशा खोट्या दाव्यांना भुलतात. त्यात विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुण्यातल्या नागरिकांचाही समावेश असतो, हीदेखील एक आश्चर्याची बाब. अलीकडेच 48 वर्षांच्या एका पुणेकराला दोन जणांनी 21.66 लाख रुपयांना गंडा घातला. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. थेरगावमध्ये राहणाऱ्या 48 वर्षांच्या एका व्यक्तीची इंटरनेटवरून दोघांनी फसवणूक केली आहे. जुलै 2021मध्ये दोघा घोटाळेबहाद्दरांनी ट्रेड शॉट एफएक्स (Trade shot FX) नावाच्या अस्तित्वात नसलेल्या फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक करण्यास आकर्षित केलं. त्या कंपनीत गुंतवणूक केलेल्या अन्य गुंतवणूकदारांना कसा चांगला परतावा मिळाला, याची माहिती देणारे काही स्क्रीनशॉट्स त्या दोघांनी या व्यक्तीला फॉरवर्ड केले.
त्यानंतर संबंधित व्यक्तीने त्यांच्या वेबसाइटला भेट दिली. त्यावरही त्या व्यक्तीला तशीच माहिती सापडली. गुंतवणूकदारांना झालेल्या नफ्याबद्दलची माहिती तिथेही पाहायला मिळाल्यावर संबंधित व्यक्ती त्या दाव्याला बळी पडली. त्या व्यक्तीने संबंधित कंपनीत ऑनलाइन अकाउंट उघडलं. आपली केवायसी डॉक्युमेंट्स अपलोड केली आणि त्या कंपनीत गुंतवणूक करायला सुरुवातही केली. संबंधित घोटाळेबाजांनी त्या व्यक्तीला चुकीची माहिती दिली आणि त्या व्यक्तीला गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत असल्याचं सांगितलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने बँक खातं, तसंच यूपीआयद्वारे तब्बल 21.66 लाख रुपये त्या व्यक्तींना ट्रान्स्फर केले. ठराविक प्रमाणापेक्षा जास्त अर्थात अव्वाच्या सव्वा प्रमाणात रिटर्न्स मिळण्याचा दावा कोणी करत असेल, त्याला भुलून न जाता त्याबद्दल शंका आली पाहिजे. बारकाईने माहिती घेतल्याशिवाय कोणत्याही ऑनलाइन किंवा ऑफलाइन योजनेत पैसे गुंतवू नयेत, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
नेमकं काय आहे फॉरेक्स ट्रेडिंग?
फॉरेक्स ट्रेडिंग ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे, जिथे जगातील सर्व चलनांचा व्यापार केला जातो. हे ट्रेडिंग कायदेशीर आहे, पण ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) घालून दिलेल्या पूर्वनिर्धारित मर्यादेखाली आहे. भारतात फॉरेक्स ट्रेडिंग सुरू करायचे असेल तर काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कारण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणे हा गुन्हा मानला जातो आणि फॉरेक्स ट्रेडिंग मॅनेजमेंट अॅक्ट १९९९ अंतर्गत जामिनाशिवाय तुरुंगवास होऊ शकतो.
आज काल सर्व ब्रोकिंग फर्म तुम्हाला forex treding करण्याची सुविधा त्यांच्या terminal वर उपलब्ध करून देतात, काही विशिष्ट CURRUNCY मध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. एचडीएफसी सिक्युरिटीज, आयसीआयसीआय डायरेक्ट आणि कोटक सिक्युरिटीज सारखे ब्रोकर्स ही सेबी नोंदणीकृत ब्रोकर्सची उदाहरणे आहेत. आयसीआयसीआय, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांना फोरेक्स ट्रेडिंग सेवा देतात.
फोरेक्स ट्रेडिंग हे भारतातील परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) आणि त्या खालील नियमांद्वारे शासित आहे. भारतातील या प्रकरणांची सर्वोच्च संस्था म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया आहे. जी कायद्याचे नियमन करते आणि सर्व महत्त्वाच्या मंजुरीसाठी जबाबदार असते.
थोडक्यात काय तर फॉरेक्स ट्रेडिंग हा गुंतवणुकीचा एक कायदेशीर आणि फायदेशीर प्रकार असू शकतो. परंतु घोटाळ्यांच्या संभाव्यतेची जाणीव असणे महत्त्वाचे आहे. जागरूक राहून आणि आवश्यक खबरदारी घेऊन तुम्ही विदेशी मुद्रा घोटाळ्याला बळी पडण्यापासून स्वतःचे संरक्षण करू शकता.. अनधिकृत प्लॅटफॉर्मची यादी न तपासता कोणताही विदेशी मुद्रा व्यवहार केल्यास कायदेशीर समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते ही बाब लक्षात ठेवायला हरकत ना
अधिकृत नसलेल्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर फॉरेक्स ट्रेडिंग करू नये, अशा अनेक सुचनाही ग्राहकांना दिल्या आहेत. असे असूनही, बरेचदा लोक मोठ्या परताव्याच्या लोभापायी फसतात आणि काही अनधिकृत प्लॅटफॉर्मद्वारे फॉरेक्स ट्रेडिंग करतात आणि नंतर त्यांना समस्यांना सामोरे जावे लागते.
अधिकृत प्लॅटफॉर्मची यादी कशी पहावी?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेली 75 अनधिकृत फॉरेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची यादी
https://rbi.org.in/scripts/bs_viewcontent.aspx?Id=4235
तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अधिकृत केलेल्या प्लॅटफॉर्मची यादी पाहायची असेल, तर ती
https://rbi.org.in/scripts/category.aspx
या लिंकद्वारे यादी पाहू शकता.
तक्रार दाखल करा..पीडित व्हा! आरोपी नको.
अशा प्रकारच्या फसवणुकीच्या प्रकरणात गुंतवणूक केलेली व्यक्ती कोर्टासमोर अतिरिक्त फिर्यादी या नात्याने हजर होऊ शकते. परंतु तसे न केल्यास मल्टिलेव्हलच्या आरोपाखाली संबंधित व्यक्ती देखील क्राईममध्ये सहभागी असल्याचे सिद्ध होऊ शकते.
अॅड. प्रसन्नकुमार जोशी
अनिरुद्ध देवचक्के
9890664779
aniruddha.devchakke@gmail.com
COMMENTS