पैका बक्कळ हाए.. महिन्याला याज (व्याज) किती देणार तेवढं बोला..!! हजारो कोटी रुपये बेभरवशाच्या गुंतवणुकीत.. ---------------------------------...
पैका बक्कळ हाए.. महिन्याला याज (व्याज) किती देणार तेवढं बोला..!!
हजारो कोटी रुपये बेभरवशाच्या गुंतवणुकीत..
-------------------------------------------------------
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी अर्थ साक्षरता महत्त्वाची.. कोण घेणार पुढाकार?
-----------------------------------------------------
....अंधाऱ्या बारमध्ये लुकलुकत्या दिव्यांच्या साक्षीने एका कोपऱ्यातल्या टेबलवर दोन सदगृहस्थ निवांत टेकलेले.. मिचमिचे डोळे आणि त्या डोळ्यात आपल्याला कोणी बघंत तर नाही ना, ही भीती.. अशी भीती तर वाटणारच ना.. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे ते दोघेही भले गृहस्थ होते.. घरी डबल इंजिनचा सरकार.. म्हणजे दोघेही नोकरीला.. दोन- एक लाख रुपये महिन्यांचं उत्पन्न.. आणि खर्च म्हणाल तर काहीच नाही..! खेड्यासारख्या शहरात पैसा उधळून उधळून असा कुठे आणि किती उधळणार?
समोरच्या खुर्चीवर एक अतिशय गोरं- गोमटं पोरगं बसलेलं. दोन्ही हातात सोन्याच्या अंगठ्या.. गळ्यात भारी भक्कम चैन आणि बारच्या बाहेर उभी असलेली मर्सिडीज त्याच्या श्रीमंतीचा प्रदर्शन करीत होती. नजरेमध्ये असलेली बेफिकिरी अधिक टोकदार करत आणि उजव्या हाताने डोक्यावरचे केसाचे टोपलं बाजूला सारत विचारत होतं, "मंग काय ठरवलंय गुर्जी.. काय करणार हायती एवढ्या पैशांचं.."
"आरं मगाधरनं तेच तर ईचारून राहिलो ना तुला.. तू म्हणतोय ते पटतंय आम्हाला पण "याज" किती देणार..?"
शेवटी त्यांनी विचारून टाकलं.
जगायचं कसं हे कळत नसलं, तरी हिशोब यांचा पक्का होता. सारं आयुष्य गणितं करण्यातच गेलेलं.. त्यामुळे दोन पैसं कुठून जास्त मिळेल, याकडे त्यांची नजर भिरभिरती असायची आणि त्यात हे मोठं मोठं आभाळाएवढं अमिष दाखविणारं पोरगं भेटलेलं..
"महिन्याला दहा टक्के देतो म्हटलं ना.. शेठजींना विचारलं होतं काल तवा ते मनले.."
आता कुठे यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं होतं. महागड्या स्कॉचचे दोन घोट आता आरामात गळ्याखाली रुचणार होते. बघता बघता तीन-चार पेग कसेबसे ओढले आणि म्हणाले, " येतूत की मंग सकाळच्याला.. २०-२० ( लाख) आणतोत कॅश..!"
..................
पोटाला कधी चांगलं चुंगलं खायचं नाही. दुधाचा रतीब लावायचा नाही. सकाळचा चहा पण तिकडेच घ्यायचा, कामाच्या ठिकाणी.. नवरा- बायको सकाळी नऊच्या ठोक्याला घरातून बाहेर पडणार कुलूप लावून ते थेट संध्याकाळीच येणार.. पै पाहुणा घरी येणार नाही. त्यामुळे तोही खर्च नाही.. मग एवढा प्रचंड पैसा घरात येतो महिन्याच्या महिन्याला. त्याचं करायचं काय? दिवसभर याच्या त्याच्या कानी लागून चौकशी करत हिंडायचं "गुतीवतो पैसा; याज किती मिळनं..?"
या असल्या आमिषाला बळी पडून नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी - शेवगाव - जामखेड भागात लाखोंनी गुंतवणूक स्वीकारणारे आणि दर महिन्याला बक्कळ व्याज देणारे निर्माण झालेत. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून अल्पावधीत असा भरमसाठ परतावा देण्याचं अमिष दाखवणाऱ्या विविध कंपन्या या भागात गेल्या आठ-दहा वर्षांपासून खूपच सक्रिय झालेल्या दिसतात.आणि लोकं आपल्या बचत, ठेव पावत्या मोडून, शेतमालाची विक्री करून आणि डबल इंजिनच्या सरकारमधून घरात येणारी लाखोंची कमाई या ठिकाणी गुंतवित आहेत. अशा कंपन्या गोळा केलेलं भांडवल कुठे आणि कसे गुंतवितात? आठ ते दहा टक्क्यापर्यंतचा परतावा कसा देतात? याबाबत कोणालाच काहीच कल्पना नाही. कंपनीची नोंदणी आहे का? याची शहानिशा देखील केली जात नाही. इतकंच काय कंपन्यांसंदर्भातले नियम, रिझर्व बँक ऑफ इंडियाचे धोरण, परवानगी तपासण्याच्या भानगडीत देखील कोणीच पडत नाही इतकी झापड या गुंतवणूकदारांच्या डोळ्यांवर आहे.
पहिल्या टप्प्यात कंपन्या युवकांना आकर्षित करून त्यांना भरभक्कम परतावा देतात. या रकमेतून हे युवक स्थावर मालमत्ता, गाड्या खरेदी करतात. त्यांचा आकर्षक राहणीमान आणि त्यांच्या वाट्याला आलेली श्रीमंती पाहून त्यांना ओळखणाऱ्यांचे डोळे दिपून जातात आणि नंतर याच युवकांना कंपनी भांडवल गोळा करण्याच्या कामावर नियुक्त करते. आणि मग असे एजंट नोकरदार, व्यापारी, उद्योगपती असे सावज हेरून त्यांना भपकेबाजपणाच्या जाळ्यात अडकवितात आणि मग सुरू होते ती गुंतवणुकीची प्रत्यक्ष कहाणी..
............
वेळ सकाळची. एका गल्लीतल्या घरात ऑफिस समोर एक टेबल. खुर्चीवर बसलेली एक डेरेदार व्यक्ती. त्या व्यक्तीच्या मागे जमिनीवर एक मोठा ट्रे ठेवलेला आणि त्या ट्रेमध्ये नोटांची बंडलच बंडलं.. टेबलच्या समोर रांग लागलेली. लोक पिशवीत, पोत्यात नोटांची बंडल भरून भरून आणतात काय.. टेबलवर ठेवतात काय.. सगळंच आक्रित..!आकडा सांगतात. पाच लाख. दहा लाख. वीस लाख आणि ती व्यक्ती न मोजताच ती पिशवी मागच्या ट्रेमध्ये रिकामी करते. एका कागदाच्या चिठ्ठीवर आकडा लिहून दिला जातो. आणि ती चिठ्ठी उराशी जपून गुंतवणूकदार समाधानाने आल्या पावली निघून जातो.. काही ठिकाणी भरण्याच्या स्लिप दिल्या जातात. तर बऱ्याचदा स्टॅम्प पेपरवर देखील अटी आणि शर्ती लिहून दिल्या जातात. परंतु त्याला कुठलाच कायदेशीर आधार नाही. तरीही लोकांना त्याच्यातच समाधान वाटतं.. हेच सगळ्यात भयानक..
काहींना सुरुवातीचे काही महिने व्याज मिळतं.काहींना थोडे जास्त महिने मिळतं आणि नंतर हळूहळू महिन्याचे व्याज मिळणे देखील बंद होतं. मुद्दलाचा तर तपासच लागत नाही आणि वसुलीचा लाकडा लावायचा तरी कोणाकडे? असा प्रश्न पडतो. ठराविक मर्यादेपर्यंत भांडवल गोळा झालं की तिथून पळ काढला जातो आणि नवीन शहरात पुन्हा सुरू होतो हाच जुना खेळ नव्या आमिषांच्या तिकिटावर..! त्यात भरडली जाते सर्वसामान्य सुशिक्षित आणि डोळस जनता..
दोन दिवस या भागात दौऱ्यावर होतो, तेंव्हा लोकांशी बोलताना हे सगळे धक्कादायक प्रकार कानावर पडले. पाथर्डी- शेवगाव परिसरात सध्या जमिनींना पण खरेदीदार नाहीत असे म्हणतात.. त्याचं कारण हेच या भागात असा एकही राजकीय नेता किंवा पोलीस अधिकारी नाही ज्याला हे प्रकार माहित नाहीत परंतु तक्रारदारांकडे गुंतवणुकीचा कोणत्याच प्रकारचा कायदेशीर पुरावा नसल्याने सगळेच हातबल आहेत. ज्ञानराधा मल्टीस्टेट, राजस्थानी अर्बन आणि यासह अशाच कितीतरी अनेक संस्थांच्या घोटाळ्यामुळे ठेवीदारांच्या करोडो रुपयांच्या ठेवी अडकलेल्या आहेत. त्यांचा आक्रोश नित्यनेमाने पाहायला मिळतो. त्यामुळे बीड जिल्ह्यातलं ग्रामीण अर्थकारण तर पूर्णपणे उध्वस्त झालेलं आहे आणि त्याची लागण हळूहळू लगतच्या नगर जिल्ह्याला सुद्धा होताना दिसते आहे. नगर जिल्ह्यातही यापूर्वी अशा काही पतसंस्थांचे घोटाळे उघडकीस आलेले आहेत आणि राज्यातही येऊ लागले आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी एक प्रकारची आर्थिक असुरक्षितता जाणवत असताना गुंतवणूकदारांनी सुद्धा आता अधिक सजग व्हायला हवं आणि डोळ्यात तेल घालून आपल्या हक्काच्या गुंतवणुकीचा विचार करायला हवा..
दरवर्षी साधारणतः दोन ते तीन हजार कोटी रुपयांचा असा घोटाळा होतो, असे काही जण सांगत होते. या सगळ्या प्रकारात अनेक कुटुंब उध्वस्त झालेली आहेत. खाताना, वागताना आणि आयुष्य जगताना कंजूशी केली आणि बचतीचा पैसा अशा बेभरवशाच्या ठिकाणी गुंतवला की शेवटी हाती दुसरं काय येणार..?
"झुकेगा नही साला..!" हे पिक्चर मध्येच शोभून दिसतं. वास्तवात मात्र "झुकता है.. लेकिन झुकानेवाला चाहिये" हेच खरं..!
ग्रामीण भागातील अर्थ साक्षरता वाढीस लागावी आणि लोकांनी व्याजाच्या आमिषाला बळी न पडता स्वतःला सुरक्षित करावं, याकरिता पतसंस्थांचे फेडरेशन, विविध पतसंस्थांचे चेअरमन, पदाधिकारी आर्थिक क्षेत्रातले जाणकार, राजकीय नेतेमंडळी, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, त्यांचे कर्मचारी पोलीस यंत्रणा, जिल्हाधिकारी कार्यालय अशा सर्वांनीच संयुक्तपणे प्रयत्न करायला हवेत.
आणखी काय करता येईल, कोणी सुचवू शकेल काय..?
.. अनिरुध्द देवचक्के
COMMENTS