विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे कथित '१२ आमदार'.. एक गौडबंगाल २८ एप्रिल २०१९ विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटी...
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे कथित '१२ आमदार'.. एक गौडबंगाल
२८ एप्रिल २०१९
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे कथित १२ आमदार' हा भाजपसाठी, शिवसेनेला असलेला एक उत्तम पर्याय होता. आता या पर्याया बरोबरच शिवसेनेलाही सोबत घेण्याची भाजपची 'चाल' आगामी काळात जिल्ह्यासह, राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणण्याचीच दाट शक्यता आहे. साधारणतः दोन वर्षांपूर्वी शिवसेना नेते राजीनामे खिशात घेऊन फिरत होते; त्या काळात वातावरण अस्थिर होतं आणि तेंव्हाच ऐन वेळेला शिवसेनेने दगा दिला तर राधाकृष्ण विखे यांच्यासह बारा आमदारांना भाजपात प्रवेश देऊन सरकार चालवायचं, अशी नीती ठरविण्यात आली होती. या राजकीय डावपेचांचा अंदाज आल्यामुळेच शिवसेनेने खिशात ठेवलेले राजीनामे बाहेर काढलेच नाहीत. मध्यंतरीच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. आणि सरतेशेवटी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर का होईना भाजपला शिवसेनेशी युती करावी लागली. लोकसभा निवडणूक 'युती' करून लढविली असली, तरी आगामी विधानसभेच्या निवडणुकीत ही युती अशीच अबाधित राहील का? याबाबत मात्र आज शंका घेतली जाऊ लागली आहे.
भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी राधाकृष्ण विखे यांच्याकडे आहे. परंतु 'फडणवीस आणि विखे यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी साटलोटं आहे', त्यामुळेच मुख्यमंत्री आणि विद्यमान सरकारच्या विरोधात म्हणावी तशी आरोपांची फलंदाजी केली जात नाही असेही आरोप झाले. विखे यांच्या ऐवजी शिवसेनेनेच विरोधी पक्षनेत्याची भूमिका प्रभावीपणे बजावल्याचे गेल्या साडेचार वर्षात पहायला मिळालं.
राज्यातील राजकारणाच्या या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे यांचं, भाजपा प्रवेशाबाबत जे तळ्यात मळ्यात चालू आहे, त्याला शिवसेनेच्या राजकारणाची काही किनार तर नाही ना..? याची चर्चा नगर जिल्ह्यात सुरू झाली आहे. त्यामुळे भाजपात प्रवेश न करता विखे शिवसेनेमध्ये जातील काय? असाही प्रश्न आता विचारला जातो आहे. सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर लगेचच विखे-पाटील देखील पक्ष प्रवेश करतील असा जाणकारांचा होरा होता. परंतु त्यांनी आपले पत्ते उघड करण्याचे टाळले. विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा त्यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठवून दिला आणि पक्षाकडून आपल्या विरुद्ध कारवाई होईल, मग पुढचं पुढं बघू या प्रतीक्षेत ते राहिले. या दरम्यानच्या काळात त्यांनी दक्षिणेत डॉ. सुजय यांच्या प्रचारासाठी भरपूर मेहनत घेतली. कार्यकर्त्यांचे संघटन बांधण्याचे काम त्यांनी केलं. दक्षिणेतील निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेने त्यांना चांगली साथ दिली.मतदान पार पडल्यानंतर त्यांनी शिर्डीकडे आपलं लक्ष केंद्रित केलं. शिवसेना उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारामध्ये ते उघडपणे व्यासपीठावरही दिसले. त्यामुळेच त्यांच्या विरोधात श्रेष्ठींकडे पक्षविरोधी कारवायांच्या तक्रारींचा पाऊस पडला. दोनच दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी विखे यांचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती दिली. परंतु ते पक्षातच राहतील, असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्याविरोधात आलेल्या तक्रारींची खातरजमा केल्यानंतरच काय कारवाई करायची? याचा निर्णय पक्ष पातळीवर घेतला जाईल, असं सांगत त्यांनी विखे यांना पुन्हा अधांतरीच ठेवलं. त्यानंतर कालच राधाकृष्ण विखे यांनी आपली भूमिका जाहीर केली. ते बहुधा काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देतील आणि भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर करतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र विखे यांनी सगळ्यांचे अंदाज खोटे पाडत 'राज्यातील कार्यकर्त्यांची चर्चा करूनच आपण पुढचा निर्णय घेऊ', असे जाहीर केले आहे. हे करत असताना त्यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी त्यांच्यावरही आरोप केले. त्यांनीच आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुजय यांना लढविण्याचा सल्ला दिला होता, असेही त्यांनी सांगून टाकलं. विशेष म्हणजे आदल्याच दिवशी राहुल गांधी यांची संगमनेरला सभा झाली असताना विखे पाटलांनी अशा पद्धतीने थेट आरोप केल्यामुळे राज्यातील काँग्रेसी वातावरण पूर्णतः ढवळून निघालं आहे. विखे यांची नेमकी भूमिका आता काय राहील? याबाबत उत्सुकताही मोठ्या प्रमाणावर ताणली गेली आहे. सध्या तरी शिवसेना उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारामध्ये ते उघडपणे सामील झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस त्यांनी जवळपास सोडल्यात जमा आहे. आता ते स्वतःहून राजीनामा देतात की पक्षाकडून होणाऱ्या कारवाईची वाट पाहतात हे बघावे लागेल.
विखे-पाटलांच्या या बदलत्या राजकारणाची नगर जिल्ह्याला तशी खूप जवळून ओळख आहे. काँग्रेसमध्ये असताना 'कृतीशील विचार मंच' स्थापन करण्याची संकल्पना मांडल्यामुळे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मनातून बाळासाहेब विखे पाटील उतरले होते आणि त्यातच त्यांच्यावर पक्षाचा राजीनामा देण्याची वेळ आली. नंतर दोनच वर्षात त्यांनी जेव्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तेंव्हाही याच पद्धतीने चर्चांना प्रचंड प्रमाणात उधान आलं होतं. बाळासाहेब विखे शिवसेनेत प्रवेश करणार का? कधी करणार? त्यांच्या बरोबर कोण कोण असेल? असेच अनेक मुद्दे तेंव्हाही चर्चेत होते आणि एक दिवस त्यांनी अचानक घोषणा केली. त्यांचा प्रवेशही होऊन गेला. एक तर पूर्वीपासून नगर जिल्ह्यात 'विखे विरुद्ध बाकी सारे' असेच राजकीय वातावरण राहिले आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील कोपरगाव, संगमनेर, अकोला, श्रीरामपूर, शिर्डी,राहुरी या मतदारसंघात विखे यांचंच प्राबल्य. त्यातील राहुरी हा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर दक्षिणेत तर दक्षिणेतील नेवासा उत्तरेत समाविष्ट झाला. कोपरगाव मध्ये शंकरराव कोल्हे आणि शंकरराव काळे यांच्या राजकारणामध्ये नामदेवराव परजणे यांच्या माध्यमातून आपला स्वतंत्र दबावगट विखे पाटलांनी प्रस्थापित केला. कधी शंकरराव काळे यांच्यासाठी तर कधी शंकरराव कोल्हे यांच्यासाठी विखे-पाटलांच्या छुप्या मदतीची नौका हेलकावत असे. राहुरीमध्येही प्रसाद तनपुरे यांच्याविरुद्ध विखे पाटलांनी अन्य विरोधकांना बळ दिलं. सुभाष पाटील हे त्यांचे खंदे समर्थक. शिवाजी कर्डिले आणि बाळासाहेब विखे यांच्यातही कधीच जमलं नाही. त्यांच्यातला संघर्ष तीव्र होता. परंतु कर्डिले यांनी राहुरी मतदार संघातून निवडणूक लढविल्या नंतर विखे गटाशी जुळवून घ्यायला सुरुवात केली. संगमनेर मध्ये बाळासाहेब थोरात गटाविरुद्ध सक्षम विरोधक मात्र त्यांना उभा करता आला नाही. तरीही कार्यकर्त्यांच्या बळावर धडका देण्याचं काम त्यांनी सुरूच ठेवलं.
मधुकरराव पिचड यांच्याविरुद्ध त्यांनी ताकद उभी करण्याचा प्रयत्न केला. परंतु स्वतः पिचड यांनीच छुप्या पद्धतीने विखे यांना सहकार्य करण्याची भूमिका राजकारणामध्ये घेतली. त्याचा प्रत्यय जिल्हा परिषदेमध्ये प्रथमच शालिनी विखे यांना अध्यक्ष होताना आला. श्रीरामपूरच्या राजकारणामध्ये गोविंदराव आदिक आणि भानुदास मुरकुटे यांच्या संघर्षात कधी मुरकुटे यांच्या बाजूने तर कधी आदिक यांच्या बाजूने विखे यांचं झुकतं माप पडलेलं असायचं. गोविंदराव आदिक यांनी जयंतराव ससाणे यांना राजकारणात पुढे आणल्यानंतर ससाणे यांनी साई संस्थानचे अध्यक्ष पद मिळूनही श्रीरामपूर मधून विधानसभेच्या उमेदवारीवर दावेदारी केली, तेंव्हाच मुख्यमंत्री होण्याचं गोविंदराव आदिक यांचं स्वप्नही संपुष्टात आलं. नंतरच्या राजकारणात विखे - ससाणे असं समीकरण उदयास आलं. भानुदास मुरकुटे गटाला शह देण्यासाठी या समीकरणाने अनेक प्रयोग केले. त्यामुळेच जयंत ससाणे यांचे पुत्र करण ससाणे यांनी विखे यांच्या सांगण्यावरूनच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामाही दिला.
मतदारसंघात अनेक वर्षांपासूनचा संपर्क असल्यामुळे उत्तरेतील प्रत्येक गावाची कार्यकर्त्यांची खडानखडा माहिती प्रवरेच्या यंत्रणेकडे आहे. त्यामुळे विखे यांची मोठी राजकीय ताकद उत्तरेमध्ये नेहमीच पाहायला मिळते. त्याबाबतही काही प्रवाद आहेत. 'उत्तरेतील विखे यांची ताकद एखाद्या उमेदवाराला निवडून आणू शकत नसली; तरी त्याला पाडण्याची ताकद मात्र नक्कीच त्यांच्यात आहे! हा त्यातलाच एक प्रवाद..! अर्थात प्रत्येक निवडणुकीमध्ये कोणत्या न कोणत्या उमेदवारांनी त्यांची छुपी मदत घेतलेली आहेच.. सगळ्यांनाच या राजकारणाची पूर्णपणे कल्पना आहे. त्यामुळे दक्षिण काय किंवा उत्तर काय संपूर्ण जिल्ह्यातच विखे यांच्या राजकारणाबद्दल नेहमीच संशयाने पाहिलं जातं. त्याला शह देण्याचा काम बाळासाहेब थोरात यांनी आत्तापर्यंत केलं, पण आता मात्र उत्तरेतील सर्वच तालुक्यावर कब्जा मिळवण्याची संधी थोरात यांच्याकडे चालून आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीवर जाणारे ते नगर जिल्ह्यातील पहिलेच नेते. त्यामुळे त्यांच्या राजकारणाचा आलेख विखे यांच्या भाजप प्रवेशानेच उंचावला जाईल, अशी आशा आहे. शिर्डीतील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी थोरातांनी घेतलेली मेहनत कितपत फळाला येते? यावरच पुढचं भविष्य अवलंबून आहे. विखे यांचे समर्थक असलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी भाजपमध्ये उमेदवारीच्या आशेने प्रवेश केला परंतु नंतर बडं करून अपक्ष अर्जही दाखल केला. वाकचौरे यांनी विखे यांचंही ऐकलं नाही,असं म्हणतात. त्यात कितपत तथ्य आहे, याचा अंदाज मात्र अजूनही आलेला नाही. प्रत्यक्ष मतदानाला आता एकच दिवस उरला आहे त्यामुळे शिर्डीतील मतपेट्या नेमका कोणता चमत्कार घडवून आणतात याचीच मोठी उत्सुकता आहे.
विखे यांच्या प्रवेशाचा होणार इव्हेंट ! - लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर राधाकृष्ण विखे राज्यभरातील आपल्या समर्थकांसह आणि काही आमदारांसह भाजपात प्रवेश करतील, असा अंदाज आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा भाजप मोठ्या प्रमाणावर साजरा करून विधानसभा निवडणुकीसाठी एक प्रकारचा संदेश राज्याला देण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर शिवसेनेलाही हळुवार चिमटा घेतला जाईल, असाही संशय आहे. त्यामुळेच विखे यांचा संभाव्य भाजप प्रवेश आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला कितपत मानवतो, याचीच उत्सुकता आहे.
२८ एप्रिल २०१९
COMMENTS