निलेश लंकेच्या संभाव्य उमेदवारीचा असाही डंका.. दक्षिणेतील राजकारणाची पेटलीय लंका.. "राजकारणात रात्रीतून काहीही घडू शकतं. आता थोड्या व...
निलेश लंकेच्या संभाव्य उमेदवारीचा असाही डंका.. दक्षिणेतील राजकारणाची पेटलीय लंका..
"राजकारणात रात्रीतून काहीही घडू शकतं. आता थोड्या वेळाने काय होईल? हे सांगता येत नाही. मी लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी माझ्या सहकाऱ्यांची इच्छा आहे. माझा तसा निर्णय झालेला नाही. मी शरद पवार साहेबांना भेटलेलो नाही. माझ्या प्रवेशाचं मला कळालं तेंव्हा मी झोपलेलो होतो."
ही सगळी वक्तव्यं आहेत, पारनेरचे आमदार निलेश लंके यांची.. त्यांच्या बाबतीतला सस्पेन्स अजूनही कायम आहे. लोकसभेची निवडणूक तर त्यांना लढवायची आहे. तशी त्यांची तयारी दीड वर्षापासून सुरू देखील आहे. परंतु कोणत्या पक्षाकडून ही निवडणूक ते लढवतील? याबाबतची साशंकता अजूनही कायम आहे.
दुसरीकडे नगर दक्षिण लोकसभेची ही जागा भाजपकडे असल्याने विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही? यासंदर्भातील चर्चेचे गुऱ्हाळ अजूनही सुरूच आहे. दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सोमवारी रात्री पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील विद्यमान १२ खासदारांची नांवे उमेदवारीच्या यादीतून वगळण्याचा निर्णय झाला असल्याच्या बातम्या वाचायला आणि पाहायला सध्या मिळत आहेत. एक-दोन दिवसातच त्याबाबतचे अधिक स्पष्टीकरण येऊ शकेल.
या बातम्या जर खर्या असतील आणि त्यानुसार डॉ. सुजय विखे पाटील यांचा पत्ता जर कट झालेला असेल, तर त्यांच्या ऐवजी भाजपाची उमेदवारी कोणाला? हा मूळ प्रश्न पुन्हा एकदा डोके वर काढून पुढे आलेला आहे.
राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचे खासदार आणि सध्याचे बलाढ्य, तुल्यबळ नेते डॉ. अमोल कोल्हे यांनी तीन दिवसांपूर्वी निलेश लंके यांना शरद पवार गटातील प्रवेशाचे आवतान दिले आणि तेव्हापासून दक्षिणेतून लंके "तुतारी फुंकणार" अशा चर्चाही सुरू झाल्या. सोमवारी सकाळपासून लंकेच्या प्रवेशाच्या बातम्या झळकू लागलेल्या होत्या. दुपारनंतरच या संदर्भातलं चित्र स्पष्ट झालं, जेंव्हा शरद पवार यांनीच आपल्या नेहमीच्या खास स्टाईलने "मला तर हे माहीतच नव्हतं. तुमच्याकडूनच कळालं" असं सांगून पडदा टाकला तेंव्हा..
सोमवारच्या या सगळ्या नाट्यमय घडामोडीनंतर सर्वांचीच डोकी जणू काही भंजाळून निघाली. माध्यमांनी निलेश लंके यांना गाठलं तेंव्हा त्यांनी तर "नरो वा.. कुंजरो वा.."अशीच भूमिका घेतली. 'मला काही माहीतच नाही. मी शरद पवार साहेबांना भेटलेलोच नाही. निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय अजून झालेला नाही. पक्षप्रवेशाचा काही संबंध नाही. मला तुमच्याकडूनच हे सगळं कळतं आहे. राजकारणाचं काय खरंय..? रात्रीतून काहीही घडू शकतं. आता पुढच्या क्षणाला काय होईल ते सांगता येणार नाही. अशा प्रकारची गोलमटोल वक्तव्य करून त्यांनी देखील हा संभ्रम आणखीनच वाढवला आहे.
निलेश लंके यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाच्या बातम्या तेंव्हापासूनच सुरू झाल्या, जेंव्हा खा.अमोल कोल्हे यांनी त्यांना महानाट्याच्या समारोपाच्या दिवशी पक्षप्रवेशाचे निमंत्रण दिलं. इथे मुळात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे अमोल कोल्हे हे नाट्य-कला- संस्कृती क्षेत्रातील महान कलाकार आहेत आणि तो त्यांचा उपजिविकेचा मुख्य व्यवसाय आहे. राजकारण हे त्यांच्यासाठी 'गाजराच्या पुंगी' सारखं आहे. वाजली तर वाजली.. नाही तर मोडून खाल्ली..!! आणि ही गोष्ट स्वतः शरद पवार देखील ओळखून आहेत.
भविष्यात अमोल कोल्हे खासदार नाही झाले, तरी देखील त्यांच्या एकूणच करिअरवर कसलाही परिणाम जाणवणार नाही. याउलट निलेश लंके यांची परिस्थिती वेगळी आहे. ते स्वतः हाडाचे राजकारणी आहेत. राजकारण हे त्यांचं करियर आहे. म्हणून कोणताही निर्णय धोकादायक पद्धतीने घेण्याची मानसिकता त्यांची नसावी, हे उघड आहे. त्यामुळे लंके जेंव्हा म्हणाले, 'अमोल कोल्हे यांच्याशी राजकीय चर्चा करण्याचा विषय नव्हता. आम्ही महानाट्य संदर्भात बोललो.' ते अतिशय बरोबर होतं. अमोल कोल्हे जरी शरद पवार साहेबांचे प्रवक्ते असले, तरी देखील त्यांच्या पक्षात अंतिम निर्णय शरद पवारांचा असतो. तिथे अमोल कोल्हे यांच्या मताला कितपत महत्त्व द्यायचं हे देखील ठरवलं जातं. परंतु अमोल कोल्हे हे सेलिब्रेटी असल्यामुळे त्यांच्या वक्तव्याला डोक्यावर घेऊन लंकेचा शरद पवार गटातील प्रवेश निश्चित करून टाकला जातो, तेंव्हा अशा प्रकारचे संभ्रम निर्माण होतात.
देशाच्या एकूणच राजकीय पटलावर ज्या राजकीय पक्षाला आता नव्याने आपले स्थान निर्माण करायचे आहे, अशा शरद पवार यांच्या "तुतारीवाल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर" आपलं अख्ख राजकीय करियर भावनेच्या भरात पणाला लावण्याचा धोका निलेश लंके कितपत पत्करतील याबाबत नक्कीच शंका आहे.
शरद पवार यांनी राजकारणातील आपला एकूणच तजुर्बा आणि अनुभवाच्या जोरावर नव्याने उभारी घेण्याची तयारी सुरू केलेली आहे खरी; परंतु त्यांच्या वाटेवर सध्या तरी असंख्य काटे विखुरलेले पाहायला मिळतात. बारामती मध्ये त्यांनी व्यापाऱ्यांची एक बैठक आयोजित केली होती. परंतु गेली 50 वर्ष ज्या व्यापाऱ्यांनी त्यांना साथ दिली, त्यांनीच 'आम्हाला वेळ नाही', असं पत्र दस्तूर खुद्द शरद पवार यांनाच पाठवून दिलं. यावर 'गेल्या पन्नास वर्षात असं कधी झालं नाही,' असं म्हणत शरद पवार यांनी देखील आपली नाउमेदी स्पष्ट केली. दररोज अशा प्रकारचे अडथळे समोर येत असताना आणि त्यावरून पक्षाच्या स्थितीचा अंदाज येत असताना निलेश लंकेसारखा जाणकार आणि मुरब्बी राजकारणी असा काही निर्णय घेऊ शकेल असे वाटत नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात आज तरी शरद पवार यांची चोहोबाजूने कोंडी झाल्यासारखे दिसते आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातच शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी दोन्ही पवारांच्या विरोधात शड्ड थोपटले आहेत. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोन्ही उमेदवारांच्या विरुद्ध आपण लोकसभा निवडणूक लढणार आहोत, असंही त्यांनी जाहीर केलेलं आहे. अर्थात त्यांच्या या भूमिकेला अजितदादा पवार यांनी २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा केलेला अपमान कारणीभूत आहे.
इथे एक प्रश्न असा येतो की अचानकपणे विजय शिवतारे यांनी एका कार्यक्रमामध्ये असे सडेतोड भाषण का केले आणि त्या पाठोपाठ निवडणूक लढवण्याची घोषणा नेमकी का केली? त्यांना दुसरं कोणी उद्युक्त केलं असेल का? आणि केलं असेल तर का केलं? असेही काही प्रश्न आहेत. दररोज अशी एक - एक वेगवेगळ्या प्रकारची डोकेदुखी समोर येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या पक्षाचं राजकीय पुनरुज्जीवन नेमकं कसं होणार? याबाबतची शंका भेडसावल्याशिवाय राहत नाही. अशा परिस्थितीत शरद पवार यांनी अचानकपणे काही धाडसी निर्णय घेतला तर त्याचा धक्का बसू नये, अशी परिस्थिती आहे.
दक्षिणेच्या बाबतीत भाजपने डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी नाकारलीच, तर त्यांच्या जागेवर पक्षाचा उमेदवार नेमका कोण असेल? हा आता खरा कळीचा मुद्दा आहे. भाजपने विद्यमान महसूल मंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनाच ही निवडणूक लढवण्याविषयी सुचविले असल्याचे सांगितले जाते. परंतु विखे यांच्याकडून मात्र जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील किंवा सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्रीताई विखे पाटील यांच्यापैकी उमेदवारी द्यावी, असे सुचवले आहे असेही कळते. भाजपला मात्र हा प्रस्ताव मान्य नाही. राज्यातील ज्येष्ठ आणि प्रशासकीय कामकाजाचा उत्तम अनुभव असलेले राधाकृष्ण विखे पाटील दिल्लीत जाण्यास फारसे उत्सुक नाहीत. त्यामुळे हा संभ्रम आणखीनच वाढला असल्याचे सांगितले जाते.
याचा थोडक्यात अर्थ असा की आम्ही सुचवतो, त्याप्रमाणे तुम्हीच पर्याय द्या. आणि तुम्ही जर पर्याय देऊ शकणार नसाल, तर पक्ष म्हणून आम्ही निर्णय घेऊ त्याला साथ द्या. अशा प्रकारची राजकीय कोंडी भाजपने विखे यांची करून ठेवलीय.
येत्या एक-दोन दिवसातच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. परंतु प्रत्यक्ष कृती मात्र थोडी उशिराने होण्याची शक्यता आहे. शेवटच्या टप्प्यात जी यादी जाहीर होईल, त्यामध्येच धक्कादायकरित्या उमेदवाराचं नांव घोषित केलं जाईल, असं सध्या तरी पाहायला मिळत आहे.
COMMENTS