आ डवळणानेच जातं ते असतं राजकारण..! सरळ मार्गाने जातं, त्याला राजकारण कधीच म्हणत नाहीत. पण "आम्ही सरळ मार्गाने राजकारण करतो" असं दा...
आडवळणानेच जातं ते असतं राजकारण..! सरळ मार्गाने जातं, त्याला राजकारण कधीच म्हणत नाहीत. पण "आम्ही सरळ मार्गाने राजकारण करतो" असं दाखवण्याची एक पद्धत असते.. प्रथा असते..! या प्रथेप्रमाणे कोणी वागलं की नक्कीच संशय निर्माण होतो. त्याचे वेगळे वेगळे अर्थ अन्वयार्थ लावले जातात. त्यातच दडलेले असतात भविष्यातील राजकारणाचे खरे रंग..!
नमो महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि देवेंद्र फडणवीस चार मार्च रोजी बारामतीत येत आहेत. सत्ता पालटानंतर आणि विशेष म्हणजे राजकारणाच्या पटलावरून राष्ट्रवादीचे शरद पवार आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे या दोघा महान नेत्यांना निष्प्रभ केल्यानंतर त्यांचा हा पहिलाच संयुक्त बारामती दौरा.. बारामतीत राहून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्ष अनेक कलागुती आणि राजकीय कसरती केल्यानंतर, ज्यांनी आपल्याला चितपट केलं असे नेते बारामतीला येत आहेत म्हटल्यावर शरद पवारांना तरी स्वस्थ बसवेल का? त्यांनी मुख्यमंत्र्यांना भोजनाचं आमंत्रण दिलं आणि त्याच पत्रात अजित दादा पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही आमंत्रित करीत असल्याचा उल्लेख केला. हा कार्यक्रम ज्या शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणात होतो आहे, ती विद्या प्रतिष्ठान संस्था मी स्थापन केलेली आहे आणि त्या संस्थेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे याचाही उल्लेख शरद पवारांनी या पत्रात आवर्जून केलेला दिसतो..
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भोजनाचं आमंत्रण देणं यात काही गैर नाही. वरवर पाहायला गेलं तर ही सहज, साधी आणि सरळ अशी कृती दिसते. परंतु राजकारणात मुरलेल्या शरद पवारांकडून अशी "सरळ" कृती होणं हे अपेक्षितच नाही. त्यामुळे "आडवळणानं" जाणारं हे त्यांचं राजकारण नेमकं काय आहे? हे उलगडून पाहायलाच हवं. गेल्या ४० वर्षांमध्ये एखाद्याला जेवणाला बोलवण्याचं असं भांडवल आणि त्याचा प्रपोगंडा मीडियाच्या माध्यमातून शरद पवारांनी कोणा विरोधकांच्या बाबतीत कधी केल्याचं ऐकिवात नाही.. आजपर्यंत कधीही न केलेली ही "लंच/ डिनर डिप्लोमसी" याचवेळी आणि आत्ताच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना का करावीशी वाटली यामागे नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे हे निश्चित!!
शरद पवारांनी रचला होता एक सापळा! आणि सावज होतं देवेंद्र फडणवीस!!
शरद पवारांनी रचलेला हा एक सापळा होता. या सापळ्यात त्यांना खरं सावज पकडायचं होतं ते देवेंद्र फडणवीस..! एकनाथ शिंदे आणि अजित दादा यांचा काही तसा फारसा प्रश्नच नव्हता.. दादांसाठी ते फॅमिली मॅटर होतं आणि एकनाथ शिंदे, फडणवीस यांना विचारल्या शिवाय काहीच निर्णय घेऊ शकत नाहीत, हे तर साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा हे निमंत्रण नाकारायचं ठरवलं आणि तसं पत्र रवाना केलं. तेंव्हाच मुख्यमंत्र्यांनी देखील नकाराचं पत्र पाठवून दिलं आणि लौकिक अर्थाने फडणवीसांनी या सापळ्यात अडकण्या वाचून स्वतःला सोडवून घेतलं..
नेमका काय होता हा सापळा?
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष फुटल्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षांची परीक्षा आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे. शेवटी जनाधार कोणाला मिळणार यावरच बऱ्याच जणांचं पुढचं भवितव्य अवलंबून असेल. अजित दादा, पार्थ पवार आणि जय पवार या तिघांना आणि तसंच एकनाथ शिंदें,श्रीकांत शिंदेंना देखील आपले जुनेच पक्ष स्वतःच्या नेतृत्वाखाली राजकारणात पुनर्प्रस्थापित करायचे आहेत. शरद पवारांचा तुतारीवाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंची मशालवाली शिवसेना या दोन्ही पक्षांपुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय..
शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था अगदीच खिळखिळी होतेय. सुप्रिया सुळेंच्या राजकारणातील प्रवेशानंतर २००४- ०५ पासूनच अजित पवारांनी भविष्यातील वारसाहक्काचा धोका ओळखून आपलं स्वतंत्र नेतृत्व राष्ट्रवादीच्याच माध्यमातून ग्रामीण भागामध्ये रुजवण्याचा प्रयत्न, साहेबांचे शिलेदार वगळून तत्कालीन नव्या पिढीच्या माध्यमातून केला. त्याचं फळ त्यांना मिळतंय.किंबहुना तोच त्यांच्या राजकारणाचा रचलेला पाया होता.
काकांकडून मिळालेलं राजकारणातलं बाळकडू त्यांनी वापरलं, ते तेव्हापासूनच आणि त्याचमुळे आज एवढा मोठा धाडसी निर्णय अजितदादा घेऊ शकले. त्याचा परिणाम आज असा दिसतोय की शरद पवारांना ज्या नेत्यांच्या भरोशावर नव्याने पक्षाची रुजुवात करायची आहे, ते त्यांचे जुने-जाणते, सहकार महर्षी नेते आता निर्णय प्रक्रियेत कुठेच नाहीत. त्यांचे निर्णय आता दुसरी आणि तिसरी पिढी घेऊ लागलेली आहे, जी कधीच अजितदादांच्या वळचणीला जाऊन बसलीय. नेमकी कधी? ते पवार साहेबांना आणि सुप्रिया ताईंना शेवटपर्यंत लक्षातच आलं नाही. थोडक्यात शरद पवारांना वाटतं तेवढं सोप्पं राजकारण महाराष्ट्रात राहिलेलं नाही आणि म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची अवस्था आता "सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही" अशी झालेली दिसतेय.
त्या तुलनेत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना मात्र अजूनही म्हणावी तेवढी उद्ध्वस्त झालेली दिसत नाही. उलट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून एक प्रकारची सहानुभूती मिळवण्याचा जो प्रयत्न, भावनिक आवाहन करून सुरू ठेवलेला आहे, त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसवर देखील एक प्रकारचं नैराश्याचं सावट पसरलेलं दिसतंय. त्यामुळे अगदीच दीड- दोन वर्षांपूर्वी जी शिवसेना, शरद पवारांच्या मागे फरफटत जाताना महाराष्ट्राने पाहिली, तिथेच आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आधार म्हणून पाहण्याची केविलवाणी वेळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर आलीय आणि हीच बाब स्वाभिमानी शरद पवार यांना कधीच सहन होणारी नाही.
शरद पवार राजकारणातील बादशहा आहेत का? तर आहेत. त्यांचे नेतृत्व दमदार धडाकेबाज आहे का? तर आहे. त्यांच्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या मनात सहानुभूती आहे का? तर आहे. पण याचा अर्थ त्यांनी राजकारणात टाकलेले सगळेच फासे योग्य त्या जागेवर जाऊन अडकतीलच याची मात्र कसलीही शाश्वती राहिलेली नाही. कारण पवारांचे ठोकताळे जुन्या काळाशी सुसंगत होते आणि ते आता कालबाह्य ठरू लागलेले आहेत. आता राजकारणात चलती देवेंद्र फडणवीस यांच्या ठोकताळ्यांची आहे. फासा नेमका कधी आणि कुठे टाकायचा आणि कोणाला त्यात अडकवायचं हे सध्याच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना जमू जाणे..! आणि हीच बाब सध्या शरद पवार यांच्या अवतीभवती वावरणाऱ्या लोकांच्याही लक्षात येऊ लागलेली आहे. जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हेंसारख्या नेत्यांच्या काही व्यक्तिगत अडचणी आहेत. काही गुंतागुंत आहे. त्यामुळे त्यांना दुसरा पर्याय दिसत नाही. म्हणून जोपर्यंत शरद पवार सांगत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याबरोबर चिकटून राहणं हे त्यांना फायद्याचं वाटतं. त्यासाठी थोडं फार राजकीय नुकसान सहन करण्याची ही त्यांची मनाची तयारी दिसते आहे. सुप्रिया सुळे यांचा तर काही प्रश्नच नाही.
शरद पवार यांच्या "लंच/डिनर डिप्लोमसी"ला ही एवढी सारी पार्श्वभूमी आहे.. राजकारण वगैरे बाजूला ठेवा पण आता शरद पवारांना खऱ्या अर्थाने कोणती चिंता भेडसावत असेल बरं..? एकच चिंता.. सुप्रिया सुळे यांचं पुढे काय होणार? राजकारणात आता आणखी काही मिळवणं हे शरद पवारांचे स्वप्न असूच शकत नाही. त्यामुळे अजित दादांनी इतकं सांगूनही राजकारणातून निवृत्ती घेण्याचा विचार त्यांच्या मनाला शिवला नाही. सुप्रिया सुळेंच्या ताब्यात पक्ष देऊन स्वतःचा वारसा एकदा त्यांच्याकडे सुपूर्द केला की आपल्यासारखंच सुप्रियाताई महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बलाढ्य शक्ती होतील असं त्यांना वाटलं. त्यामुळेच त्यांनी अजितदादांचा सल्ला मानला नाही आणि राष्ट्रवादीत फूट पडली. इतकं होऊन देखील आपण आपल्या कर्तुत्वावर आणि ताकदीवर पक्ष पुन्हा पुनर्स्थापित करू असं त्यांना वाटलं. पण शेवटी वस्तुस्थिती लक्षात यायला सुरुवात झाली, तेंव्हा एक प्रकारची वैचारिक हतबलता निर्माण झालेली पाहायला मिळाली. बारामतीतील सुप्रिया सुळेंची जागाच धोक्यात आहे हे लक्षात आल्यावर मामला आणखीनच गंभीर झाला. या म्हणूनच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत लंच/ डिनर डिप्लोमसीचा बेत आखला असावा आणि तो व्हायरल करून मतदारांना एक गुप्त संदेश देण्याचाही त्यांचा हा प्रयत्न असण्याची शक्यता आहे. सन्मानाने निवृत्त होण्यासाठी एवढा एकच मार्ग सध्या तरी त्यांच्यापुढे शिल्लक आहे. पडद्याआड बऱ्याच राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. लवकरच या नव्या नाटकाचाही पडदा उघडेल अशी अपेक्षा आहे.
काय होता हा बेत? पुढे काय होऊ शकतं?
लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर शरद पवार अखेर "राजकारणातून निवृत्ती" घोषित करू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सन्मानाने अजित दादा पवार यांच्याकडे सुपूर्द करू शकतात. दादा देखील झालं गेलं विसरून पुन्हा एकदा शरद पवार यांच्याशी जुळवून घेतील आणि त्यानंतर सुप्रियाताई आणि अजितदादा दोघांची राजकीय कारकीर्द भाजपाच्या साथीने बहराला येऊ शकेल. अर्थात रोहित दादा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे तिघेही साथीला असतीलच. सुनेत्रा पवार यांना कदाचित पुढे राज्यसभेवर घेतले जाईल.
शेवटी राहतो तो एकच प्रश्न.. साहेबांना पडत्या काळात ज्यांनी साथ दिली, त्या अन्य नेत्यांचं काय होईल? अशा सर्व नेत्यांना पवार साहेब कोणत्याही राजकीय पक्षात जाण्याची मुभा देऊन टाकतील. त्यामुळे त्यातले बरेच जण भाजपात प्रवेश करून मोकळे होतील. दादांशी 'पंगा' घेऊन आधीच एकमेकांची मनं दुखावली गेलेली आहेतच.त्यामुळे राष्ट्रवादीत दादांच्या नेतृत्वाखाली राहणं म्हणजे त्यांच्यासाठी तोंड दाबून बुक्क्यांचा मार ठरेल. आणि इकडे भाजप तर नेत्यांच्या इन्कमिंग साठी टपलेलीच आहे.
इकडे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून आधी अजित पवार यांच्या गटात गेलेले पारनेरचे आमदार निलेश लंके, शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
अमोल कोल्हे यांच्या साथीने शंभूराजे नाट्य प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी आपलं शक्तिप्रदर्शन चालवलंय. लवकरच त्यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची शक्यता आहे.
.. पण शरद पवारांनी असा काही वेगळाच निर्णय ऐनवेळी घेतला तर निलेश लंके यांचं काय होईल?
वाचा पुढील भागात
COMMENTS