दे धक्का.. महा लोक (सभा) नाट्य लवकरच.. आ. निलेश लंके दक्षिणेतून भाजपाचे उमेदवार? https://youtu.be/yLaVIkApKNk लोकसभेच्या अहमदनगर दक्षिण मत...
दे धक्का.. महा लोक (सभा) नाट्य लवकरच.. आ. निलेश लंके दक्षिणेतून भाजपाचे उमेदवार?
https://youtu.be/yLaVIkApKNk
लोकसभेच्या अहमदनगर दक्षिण मतदार संघातून विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना भाजपने तिकीट नाकारलंच तर भाजपाचे उमेदवार नक्की कोण ?
सर्वांच्या मेंदूला झिणझिण्या आणणाऱ्या प्रश्नाचं नेमकं उत्तर असेल..
पारनेरचे विद्यमान आमदार निलेश लंके..!
धक्का बसला ना वाचून.. असं कसं काय शक्य आहे? ते होऊ शकत नाही, असंच वाटतंय ना तुम्हाला.. अगदी बरोबर आहे तुमचं.. परंतु जर तुम्ही या सर्व नेत्यांच्या गेल्या वर्षभरातील हालचाली अगदी व्यवस्थितपणे टिपल्या असतील तर तुम्हाला त्याचं काहीच आश्चर्य वाटायला नको.. ते साधं, सोपं आणि सरळ गणित आहे.
नेमका काय आहे हा फंडा? चला तर मग जरा समजावून घेऊयात..
नगर जिल्ह्याचा राजकारण हा एक नेहमीसाठीचा बुद्धिबळाचा डाव असतो. प्यादे आपापसात लढत असतात. राजा आणि वजीर कायम आक्रमक भूमिकेत असतात. त्यांच्या सूचनेप्रमाणे सैन्य एकमेकांमध्ये काटाकाटी करत असतं. प्रत्यक्ष हल्ला म्हणाल तर तो कोणी करत नाही. पडद्यामागून मात्र बऱ्याच हालचाली सुरू असतात..
लंकेंच्या महा लोक(सभा)नाट्याचे दिग्दर्शक आहेत प्रा. राम शिंदे!
भाजपचे दक्षिणेतील सध्याचे ज्येष्ठ नेते म्हणून ज्यांचं नांव पुढे येतंय, ते आहेत माजी मंत्री प्रा.राम शिंदे! सुरुवातीच्या काळात भाजपचं काम करत होते तेंव्हा जामखेड सारख्या शहरात एका छोट्याशा गल्लीतील कार्यालयामध्ये बसून ते पक्षाचे संघटन करीत. याच काळात सदाशिव लोखंडे यांचा कर्जत - जामखेड मतदार संघावर भाजपचे आमदार म्हणून वरचष्मा होता. मतदारसंघ राखीव होता तोपर्यंत लोखंडेंची चलती होती.
सध्याही शिर्डीचे खासदार म्हणून लोकं गेली पाच वर्ष जशी त्यांना 'शोधत' होती, तीच परिस्थिती त्या काळात त्यांच्या बाबतीत होती. उन्हाळा आला नि् पाण्याची टंचाई निर्माण झाली की मग लोखंडे यांच्या अंगात मोठी ताकद यायची. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन येणं, आंदोलनं करणं आणि पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून द्यावेत म्हणून आग्रही राहणं असा एक कलमी कार्यक्रम त्यांचा त्या काळात होता. बाकी उरलेला वेळ ते मुंबई परिसरातच कुठेतरी असायचे..
हळूहळू राम शिंदे कार्यकर्त्याचे नेते झाले. जिल्हा संघटनेत काम करू लागले. पुढे आमदार झाले. मंत्री झाले. युतीच्या काळात पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळ गेले.. सदैव लोकांमध्ये राहणारा माणूस अशी त्यांची जी ओळख पूर्वीच्या काळी होती, ती नंतर हळूहळू बदलत गेली. ठराविक गोतावळ्यातल्या लोकांनाच बरोबर घेऊन त्यांच्या माध्यमातून विकास कामं (?) करायला जेंव्हा त्यांनी सुरुवात केली, तेंव्हा मात्र लोकं त्यांच्यापासून दूर व्हायला लागले. परंतु तोपर्यंत त्यांनी मुंबईच्या वर्तुळात चांगलाच जम बसवला होता. भाजपने दिलीप गांधी यांना लोकसभेची उमेदवारी देऊ नये म्हणून जिल्ह्यात जी आघाडी कार्यप्रवण झालेली होती, त्यात तत्कालीन भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे, राम शिंदे आणि पंकजा मुंडे यांच्याशी राजकीय कनेक्शन असलेले महादेव जानकर यांचा समावेश होता. अर्थात दिलीप गांधींनी नंतर तो विरोध मोडून काढला वगैरे वगैरे.. हा गांधींच्या राजकारणाचा वेगळा भाग झाला..
सांगायचा मुद्दा असा की, पक्षाने एखाद्याला उमेदवारी द्यावी म्हणून पॉझिटिव्ह प्रयत्न करण्याऐवजी एखाद्याचं तिकीट कापण्यासाठी प्रयत्न करण्यात राम शिंदे यांचा चांगलाच हातखंडा आहे. तो त्यांचा 'युएसपी' आहे. युनिक सेलिंग पॉईंट..!
भाजपामध्ये वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर २०१९च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना चांगलाच फटका बसला. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी या मतदारसंघात बाजी मारली आणि तेव्हापासून पुढचे तीन वर्ष एका अर्थाने राम शिंदे राजकीय विजनवासातच गेलेले होते. शेवटी भाजपाने त्यांच्या नेतृत्वाची कदर केली. एकदा नव्हे दोनदा..!!
राजकारणाला गती.. बारामती!
विधान परिषदेचे आमदार होण्यापूर्वी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघासाठी विशेष निरीक्षक म्हणून नेमणूक केली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे हा मतदार संघ दत्तक म्हणून सोपवला होता आणि त्यांच्या वतीने राम शिंदे तिथे पूर्वतयारीचे काम, समन्वयक या नात्याने पाहणार होते. त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवातही केली. दोन-तीन दौरे केले. त्यामध्ये बेधडक वक्तव्य करून झाली. ती देखील चांगलीच गाजली. निर्मला सीतारामन यांचाही दौरा झाला आणि भाजपने या मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे, हा संदेश सर्वदूर गेला.
काळाच्या ओघात सगळीच समीकरणे बदलली. राष्ट्रवादी फुटली. शरद पवार राष्ट्रवादी पासून बे - सहारा झाले आणि बारामती मतदारसंघ अजित पवारांच्या रूपाने अलगदपणे भाजपच्या 'कमळात' येऊन पडला. इकडे प्रा. राम शिंदे यांना बक्षीस म्हणून विधान परिषदेवर घेण्यात आलं. ते आमदार झाले. त्यांच्या राजकीय करिअरला पुन्हा एकदा घुमारे फुटले. आता पक्षाला मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. आणि मग दक्षिणेतील खास 'शिंदे शाही पॅटर्न' सुरू झाला.
त्यांच्या टारगेटवर पहिल्यांदा कोण आलं असेल? तर ते भाजपचेच विद्यमान खासदार डॉ.सुजय विखे पाटील! आडून पाडून, खाजगी चर्चेतून, कानगोष्टीतून, कधी जाहीरपणे भाषणातून त्यांनी सुजय विखे पाटलांवर शाब्दिक टीकास्त्र डागण्यास सुरुवात केली आणि एक संदेश असा गेला की सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यामध्ये बेबनाव आहे. अर्थात तो राम शिंदे यांनी कधी नाकारला नाही.
सुजय विखे यांना विरोध भाजपाच्या संमतीने?
गेल्या वर्ष दीड वर्षापासून हा सगळा प्रकार सुरू आहे. त्यामुळे प्रश्न असा पडला की पक्ष संघटना, नियम, शिस्त, विचारांची चौकट याचा सतत डांगोरा पिटणाऱ्या भाजपामध्ये, विद्यमान खासदाराच्या विरोधात आपल्याच पक्षाचा विद्यमान आमदार नकारात्मक टीका करतोय हे भाजपच्या श्रेष्ठींना सहन होतं तरी कसं बरं.. तसा अहवाल वर गेला नसेल? आणि जर होत असेल सहन तर त्याचा सरळ सरळ दुसरा अर्थ असा की हे जे काही सुरू आहे ते भाजपच्या श्रेष्ठींना मान्य आहे आणि त्यांच्याच सल्ल्याने सुरू आहे..!
भाजपामध्ये कोणतीच गोष्ट अशी अचानकपणे घडत नाही. त्यासाठी अभ्यास असतो. पूर्वतयारी असते. नियोजन असतं. सुजय विखे यांचे तिकीट कापण्याच्या मोहिमेची सूत्र भाजपनेच राम शिंदे यांच्याकडे तर सोपविली नव्हती ना? अशी शंका यायला बराच वाव त्यामुळेच आहे..
या मोहिमेचा पहिला भाग असा होता की पक्षातल्याच नेत्याने ( राम शिंदे )विद्यमान खासदाराविरुद्ध ( सुजय विखे) बोलायला सुरुवात करून वातावरण निर्मिती करायची आणि स्वाभाविकपणे दुसरा भाग असा की जर डॉ. सुजय विखे यांचे तिकीट कापले तर त्यांच्या जागी दुसरा उमेदवार कोण? हे देखील ठरवायचं..! आणि नेमकं हेच काम राम शिंदे यांनी सुरू केलं. त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम "मी स्वतःच लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहे", असं सांगून सनसनी निर्माण करून टाकली. आणि दुसरीकडे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्याशी संपर्क वाढवला. मैत्री जोपासायला सुरुवात केली. ही मैत्री इतक्या टोकाला गेली की एका दौऱ्यात राम शिंदे यांच्या गाडीचे सारथ्य स्वतः आमदार निलेश लंके यांनी केलं. एका कार्यक्रमात त्यांना बालुशाही काय भरवली. कानगोष्टी काय केल्या.. आणि हे सगळं लपून-छपून नाही तर अगदी उघडपणाने मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर.. आणि खरा कहर तर परवा झाला. म्हणजे रविवारी ( ३ मार्च) शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या सादरीकरणाच्या प्रयोगात उपस्थिती लावून राम शिंदेंनी लंके यांचे तोंड भरून कौतुक केलं आणि निलेश लंके यांच्या भविष्याची चिंता नाही कारण जनता त्यांच्या पाठीशी असल्याचं आवर्जून सांगितलं..
अरे भाई.. कहना क्या चाहते हो..?
नगर दक्षिणेची जनता शरद पवार यांच्या उमेदवाराच्या पाठीशी आहे? आणि हे सांगतोय कोण तर भाजपचे ज्येष्ठ नेते राम शिंदे.. सब गोलमाल है.. भाई गोलमाल है। बरं.. राम शिंदे एकटेच नाही गेले तिथे, तर कोपरगावचे भाजपातील उभारते नेते विवेक कोल्हे यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि निलेश लंके यांच्या उमेदवारीला आपला पाठिंबा दर्शविला. चांगलं काम करणाऱ्या नेत्याच्या पाठीशी समाज नेमका उभा राहतो, असं सांगायला ते विसरले नाहीत.
निलेश लंके तर कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते!
राम शिंदेंचं राजकारण जरा बाजूला ठेवा आणि निलेश लंके यांचा तरी नेमकं काय चाललंय हे तपासून बघा.. कोरोना काळातील भव्य - दिव्य अशा कामगिरीनंतर निलेश लंके यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक घुमारे फुटले. तेव्हापासूनच लोकसभा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपल्या पायाला चक्क भिंगरी लावून फिरायला सुरुवात केली होती. 'जिथे कमी.. तिथे निलेश लंकेची हमी' असे एक वातावरण दक्षिणेमध्ये निर्माण करायला लंके यांनी सुरुवात केली. त्यांना चांगला प्रतिसादपण मिळाला. त्यांच्या या प्रयत्नांमध्ये अर्थातच राम शिंदे त्यांच्याबरोबर सावलीसारखे होतेच.. हेच निलेश लंके कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते. पारनेरचे शिवसेना आमदार विजय औटी यांचे खंदे समर्थक आणि स्वीय सहाय्यक. आमदार निधीतून पारनेर मध्ये जी काही कामं त्या काळामध्ये झाली, त्याचा संपूर्ण पाठपुरावा निलेश लंके यांनीच केलेला होता. आता कट्टर हिंदुत्ववादी नेते असलेल्या निलेश लंकेंनी राजकीय महत्त्वकांक्षेपोटी शिवसेना पक्ष त्यागला. 'विधानसभा लढवायचीच' हे त्यांनी जवळपास ठरवून टाकलं होतं. फक्त पक्ष कोणता याचा निर्णय होणं बाकी होतं. त्याही वेळेला भाजपचा पर्याय निलेश लंके यांच्या समोर होता. परंतु राजकीय परिस्थिती मात्र त्याला साजेशी नव्हती. त्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हातात घेऊन निलेश लंकेंनी निवडणूक लढवली आणि ते निवडून आले. एक चांगला होतकरू तरुण आमदार पक्षाला मिळाला म्हणून शरद पवार यांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. राष्ट्रवादी काँग्रेस फुटली तेंव्हा शरद पवार यांच्यासोबत राहायचं की अजितदादा पवार यांच्याकडे जायचं असा यक्ष प्रश्न लंके यांच्यापुढे उभा राहिला, तेव्हा त्यांनी शेवटी ज्यांना भविष्यातील राजकारणामध्ये आता 'स्कोप' आहे, अशा अजितदादा पवार यांच्याच नेतृत्वाची निवड केली.
पण दादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप यांची युती आहे. दक्षिण लोकसभा मतदार संघ तर भाजपकडे आहे. विद्यमान खासदार सुजय विखे यांना तिकीट नाकारलं जाईल कधी? आणि आपल्याला उमेदवारी मिळेल कधी? असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आला आणि एकदा तरी लोकसभेची निवडणूक लढवून बघायचीच या महत्त्वकांक्षेपाई त्यांनी 'दादा गट' सोडून आपली पावलं उमेदवारीच्या आशेने 'शरद पवार गटाकडे' वळविली.
इथे प्रश्न असा आहे की मुळातच हे सर्व डावपेच सुरू असतानाच त्यांना 'तुम्ही आता लोकसभेच्या तयारीला लागा', असा नेमका सल्ला कुणी दिला असेल? हा खरा कळीचा मुद्दा! आणि तो त्यांना भाजपतील वरिष्ठ नेतृत्वाचा हवाला देऊन प्रा. राम शिंदे यांनी दिला असावा अशी शंका घेण्यास बराच वाव आहे. राम शिंदे यांनी, पक्षाने त्यांच्यावर सोपविलेली ही मोहीम अशा पद्धतीने एकंदरीत फत्ते करत आणलेली दिसते आहे.
सावधान..कुंडली जुळते आहे!
मूळचा पिंड हिंदुत्ववादी विचारांचा असल्यामुळे भाजपच्या वर्तुळात निलेश लंके सहजपणाने सामावून जाऊ शकतात. शिवाय भाजपाला नेत्यांच्या बाबतीत अपेक्षित असलेले सर्व कलागुण लंके यांच्यामध्ये एकवटलेले दिसताहेत. त्यामुळे हा योग जुळून येण्याची शक्यता दाट आहे. आणि शेवटी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तरी काय खरंय? त्यांना स्वतःला सुप्रिया सुळे यांच्या राजकीय भविष्याची चिंता भेडसावत आहे. त्यामुळे कदाचित ऐनवेळी स्वतःची राजकीय निवृत्ती घोषित करून ते सुप्रिया सुळे यांचा लोकसभेतील प्रवेश अजितदादांच्या कोट्यातून सुकर करू शकतात. अशावेळी निलेश लंके यांनी काय करावं बरं..?
या सर्व पार्श्वभूमीवर आणखी एक मुद्दा असा आहे की खरंच विद्यमान खासदार डॉ सुजय विखे पाटील यांचे तिकीट कापलं जाईल? शिर्डी येथे एका कार्यक्रमात बोलताना स्वतः डॉ.सुजय विखेच शिर्डीच्या मतदारांना उद्देशून म्हणाले होते की "माझं तुमच्यावर प्रेम होतं. परंतु मला लोकसभेत खासदार म्हणून तुमच्या पासून दूर जावं लागलं. आता फक्त दोन महिनेच थांबा. मी परत तुमच्याकडे येतोय." आता या वक्तव्याचा अर्थ काय घ्यायचा.. एकतर त्यांचं तिकीट नाकारलं गेलं असावं किंवा ते स्वतःच निवडणूक लढवण्यास इच्छुक नसावेत. विधानसभेला अजून अवकाश आहे. अर्थात हे सर्व ठोकताळे आहेत. प्रत्यक्षात काय घडेल याचा अंदाज अजून स्पष्ट नाही. पण हे असं घडू शकतं हे मात्र खरं..!!
तुम्हाला काय वाटतं?
सुजय विखे यांना तिकीट नाकारून त्यांच्या ऐवजी त्यांचे वडील जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकसभेची ही निवडणूक लढवावी, असा आग्रह भाजपकडून केला जात असल्याच्या चर्चा आहेत. परंतु तसं होईल असं वाटत नाही. राज्याच्या राजकारणामध्ये मुरलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांना भाजप दिल्लीला पाठवेल याची शक्यता तूर्तास तरी नाही. शेवटी राजकारणात काहीही होऊ शकतं.
नाही का..?
COMMENTS