शेवगावच्या पूर्व भागातून तीन एजंट गायब झाल्याची दबक्या आवाजात सुरू झालीय चर्चा नगर जिल्ह्यातील शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील फॉरेक्स ट्रे...
शेवगावच्या पूर्व भागातून तीन एजंट गायब झाल्याची दबक्या आवाजात सुरू झालीय चर्चा
नगर जिल्ह्यातील शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील फॉरेक्स ट्रेडिंगच्या संदर्भात गुंतवणूकदारांना जागरूक करण्याच्या उद्देशाने "पैसा बक्कळ हाये.. महिन्याला याज किती देणार तेवढं बोला? हजारो कोटी रुपये बेभरवरशाच्या गुंतवणुकीत"
(२ फेब्रुवारी )आणि याच प्रकारचा फंडा जेंव्हा नगर शहरातही गुपचूप चर्चांमधून उघडकीस आला तेंव्हा "हमारा सपना.. मनी मनी: फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली नगरच्या डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि उद्योगपतींनाच गंडवले चक्क २०० कोटी रुपयांना"( ५ फेब्रुवारी) असे दोन मर्मभेद प्रसिद्ध झाले. या दोन्ही लेखांना वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ज्यांनी कुणी अशा गुंतवणुकी केल्या, त्या असंख्य गुंतवणूकदारांचे फोनही आले. केवळ नगर जिल्ह्यातूनच नव्हे; तर नाशिक, सिन्नर, मुंबई, नालासोपारा, ठाणे या भागातूनही अनेकांचे फोन आले. प्रत्येकाच्या व्यथा वेगळ्या होत्या आणि पैसे डुबल्याचे दुःख प्रचंड होतं. हे पैसे परत मिळवण्यासाठी आता नेमकं काय करता येईल? असाच एक प्रश्न त्यांच्या मनात होता आणि ते स्वाभाविक आहे.
ज्या वेळेला पोलीस प्रशासन, महसूल, सायबर क्राईम, पोलिसांची आर्थिक गुन्हेगारी शाखा अशा विविध मार्गाने जाऊन सुद्धा हात टेकले जातात, तेंव्हा जिथून कुठून आशेचा किरण दिसायला लागेल, अशा सर्व ठिकाणी हे गुंतवणूकदार अगदी हतबल होऊन प्रयत्न करत राहतात हेच लक्षात आलं.
आमिषाला बळी पडून आपल्या आयुष्यभराची लाखो रुपयांची पुंजी अशा महिन्याच्या आभासी व्याजापाई गुंतवणूक करणारे लोकं मोठ्या संख्येने आहेत. जमीन - जुमला विकून, प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम काढून, अन्य बँका आणि पतसंस्थांमधील ठेवी मोडून लोकं अशा पद्धतीची गुंतवणूक करू लागलेले आहेत. अशा सर्वांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्याचा या माध्यमातून हा प्रयत्न होता.
शेवगाव- पाथर्डी तालुक्यामध्ये "ठेवीदार संरक्षण आणि आर्थिक साक्षरता जनजागृती समिती" या निमित्ताने स्थापन झाली. या समितीने एक निवेदन देऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांचंही लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत प्रत्यक्ष गुंतवणूकदार लेखी स्वरूपातली तक्रार घेऊन पुढे येणार नाहीत, तोपर्यंत कोणताच कायदा किंवा यंत्रणा त्यांना न्याय देऊ शकणार नाही.
मर्मभेत प्रसिद्ध करून लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न झाला रे झाला की ज्यांच्याकडे लोकांनी ही गुंतवणूक केली आहे, अशी सर्व ब्रोकर, सब ब्रोकर, एजंट मंडळी एकत्र येऊन पैसे परत देण्याचं आश्वासन देऊन टाकतात. इतके दिवस गेले, आता आणखी थोडे दिवस वाट पाहू असं म्हणत म्हणत महिन्यामागून महिने लोटताहेत आणि लोकांनी गुंतवलेला पैसा डोळ्यासमोर डुबण्याच्या मार्गावर आहे.
मुंबईतून असाच एक फोन आला. जवळपास दीडशे गुंतवणूकदार आहेत. त्यांनी सर्वांनी 'टी पी ग्लोबल एफएक्स' या कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती. ज्याचा सविस्तर उल्लेख जुन्या 'मर्मभेद' मध्ये आहे. या सर्वांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे आपली स्टेटमेंटस किंवा जबाब नोंदविलेला आहे. संबंधित कंपनीच्या प्रवर्तकांना कलकत्ता पोलिसांनी अटकही केलेली आहे. आता प्रश्न एवढाच आहे की मुंबईतील या दीडशे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये त्यांना परत मिळणार केंव्हा? याच कंपनीमध्ये नगरच्या डॉक्टर, इंजिनियर्स आणि उद्योगपतींचा पैसा सुद्धा अडकलेला आहे. यातील काही डॉक्टर्सनी तर स्वतः ब्रोकर बनून अन्य लोकांकडून पैसे गोळे करून या कंपनीमध्ये गुंतवले होते. अशी संख्या खूप मोठी आहे. जवळपास दोन हजार कोटी रुपयांच्यावर हा आकडा जाण्याची शक्यता खाजगीत वर्तविली जात आहे.
ज्या शेवगाव - पाथर्डी तालुक्यातील लोकांना अशा प्रकारच्या गुंतवणुकीचे वेड लागलं होतं, त्या दोन्ही तालुक्यांमध्ये हा व्यवसाय गेल्या महिनाभरात आणखी फोपवला. शेवगावच्या आणि पाथर्डीच्या अनेक भागांमध्ये नवीन नवीन एजंट निर्माण झाले. त्यांनी आपली आलिशान कार्यालयं स्थापन केले. शेअर ट्रेडिंगचे क्लासेस घेऊन गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्याचं काम देखील ही अर्धशिक्षित, अल्पशिक्षित मंडळी करू लागली आणि त्यांच्याच रुबाबदार, झपकेदार श्रीमंती पेहरावाला भुलून आपली भोळी भाबडी मायबाप जनता आकर्षित होऊ लागली. हा धंदा असाच सुरू राहिला.
इथे प्रश्न हा व्यवसाय कोणी करावा किंवा नाही? असा नव्हे. परंतु जे व्यवसाय करत आहेत, ते देखील अर्धवट ज्ञानाच्या आधारे त्यामध्ये गुंतलेले आहेत आणि त्यांच्याकडे पाहून लोक चक्क फसवली जात आहेत. विशेष म्हणजे याची कल्पना ना गुंतवणूकदाराला आलेली आहे.. ना त्या एजंटला.. ना त्यांच्या ब्रोकरला..! काही ठराविक मंडळी अशी चैन मार्केटिंग करून गुंतवणुकीचे हे जाळं विणू लागलेली आहेत आणि आता तर आणखी एक धक्कादायक बातमी हाती आलीय ती म्हणजे..
शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात शेअर मार्केटवाल्यांनी दिल्या म्हणे.. 'हातावर तुरी'
त्याचं असं झालंय..
शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेयर मार्केटच्या नावाखाली भरमसाठ परताव्याचे आमिष दाखवत मोठ्या रकमा गोळा करणारे तीन एजंट चार ते पाच दिवसांपासून पसार झाले असल्याची चर्चा आहे. खरं की खोटं याची कल्पना नाही. कारण पोलीस यंत्रणा याला दुजोरा देणार नाही. त्यांना तर काहीच माहिती नाही. पण ज्यांचा कष्टाचं घामाचा पैसा तिथे अडकला आहे त्यांच्यामध्ये मात्र भेदरलेल्या आवाजात ही चर्चा सुरू झालीय. त्यामुळे परताव्याच्या भूलभुलैयाला बळी पडलेल्या गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडणं स्वाभाविक आहे. केवळ बदनामी आणि चौकशीची समेमिरा नको, म्हणून तक्रार दाखल करण्यासाठी टाळाटाळ होते आहे.
कोण होते हे एजंट? तर तुमच्या आमच्या सारखेच सर्वसामान्य कुटुंबातून आलेले हे तरुण मुलं.. आधी ते भुलले. लोकांकडून गोळा केलेल्या गुंतवणुकीवर "एक कोटी रुपयांवर एक लाख रुपये महिना" असं हे "डील" होतं म्हणतात..काही वर्षांपूर्वी सुरु झालेल्या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीने सुरवातीच्या काळात भरमसाठ परतवा दिला खरा; पण तो लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी..! एजंट कडील आलिशान गाड्या, गॉगल, घड्याळ आदी सारख्या महागड्या वस्तू पाहून या व्यवसायात अनेक युवक आकर्षित होऊन ओढले गेले. परिणामी, काही महिन्यात अनेक युवकांनी ग्रामीण भागात स्वतःची आलिशान कार्यालये, गाजावाजा करीत थाटली. आपल्याकडेच गुंतवणूकदार आकर्षित व्हावेत यासाठी प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त परतावा देण्यात स्पर्धा लागल्याचे चित्र होतं आणि आजही आहे. गुंतवणुकीवर सुमारे ७ ते २८ टक्के प्रती महिना इतक्या मोठ्या प्रमाणात हा परतावा दिला जातो. या कंपन्याकडून गुंतवणुक रकमेसह हमी बाँड घेतले जात आहेत. ठराविक कालावधीत गुंतवणूक केलेली रक्कम परत घेणार नाही, असे लेखी घेतले आहे. लोकांना गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडणाऱ्या दलालांना एक ते दोन टक्के 'कमिशन' दिले जाते. कोणतीही गुंतवणूक न करता दलाली करणाऱ्या युवकांची मोठी साखळी त्यामुळे कार्यरत झाली. त्यांना भरवसा देण्यासाठी अगोदर परतावा मिळालेल्या लोकांचे दाखले दिले जात आहेत. खरोखर शेअर मार्केट मध्ये, शेअर्स खरेदी केल्यावर इतका मोठा परतावा मिळतो का, याबाबत खात्री करण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही.
भरमसाट परताव्याची अमिषे दाखवत संबंधितांनी आसपासच्या विविध तालुक्यात तसेच विदेशातही शेकडो एकर जमीन, स्थावर मालमत्ता खरेदी केल्याची चर्चा आहे. आणि आता तर पूर्व भागातील काही गावामधील हे संबंधित शेअर मार्केट मधील विद्वान पळून गेल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहे. याला म्हणतात "लाखाचे बारा हजार.. टांगा पलटी घोडे फरार.."!!
याचा नेमका ग्रामीण अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला? तर आज या दोन्ही तालुक्यातील बाजारपेठा पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत. बाकीच्या व्यवसायांमधली आर्थिक उलाढाल थांबलेली आहे. पैशांचा चलनवळण फिरेनासं झाल्यामुळे अनेक जण द्विधा मनस्थितीत आहेत. मोठ्या प्रमाणात परतावा मिळण्याची आभासी शक्यता निर्माण झाल्यामुळे लोकांचा या बनावट शेयर मार्केट मध्ये गुंतवणुकीचा कल वाढला आहे. एकाच ठिकाणी अर्थकारण केंद्रीत झाल्याने बाजार पेठातील व्यवहार मंदावले आहेत. सर्वाधिक फटका सराफ, फर्निचर, बांधकाम व्यावसायिकांना बसला आहे. तसेच बँका पतसंस्थाच्या तिजोऱ्या रिकाम्या होत आहेत.
अर्थ साक्षरता अभियान राबवायलाच हवं!
या संपूर्ण समांतर अर्थव्यवस्थेला लोकांनी स्वतःच जागरूक होऊन आळा घातला नाही, तर येत्या काही महिन्यात ज्यांचे लाखो रुपये डुबले असे तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य बंधू आणि भगिनी आत्महत्येच्या दिशेने आपली पावलं उचलण्याचा मोठा धोका आहे. आपली शासन व्यवस्था एकमेकांची उणीदुणी काढण्यात आणि निवडणुकीच्या चक्रात गुंतलेली आहे. या अशा किरकोळ(?) प्रश्नांकडे लक्ष द्यायला त्यांना कसलाही वेळ नाही आणि आता तसंही शासनावर अवलंबून राहण्याचे दिवसच राहिलेले नाहीत. आपल्यालाच काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील ज्या ज्या भागांमध्ये अशा पद्धतीचे नसते उद्योग सुरू आहेत, त्या भागातील जे कोणी सुज्ञ, जाणकार, आर्थिक सल्लागार, सी.ए, बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ज्ञ, पतसंस्थांचे फेडरेशन चालविणारे सर्व नेते, जिल्हा निबंधक, तालुका निबंधक, आर्थिक क्षेत्रातील कायदेतज्ज्ञ, वकील अशा मंडळींनी निदान आता तरी पुढाकार घेऊन एक मोठं "अर्थ साक्षरता अभियान" किंवा आंदोलन हाती घेण्याची नितांत आवश्यकता आहे.
COMMENTS